Tue, Jul 23, 2019 10:29होमपेज › Belgaon › युवा आघाडीचे पुन्हा घुमणार वादळ !

युवा आघाडीचे पुन्हा घुमणार वादळ !

Published On: Dec 28 2017 1:34AM | Last Updated: Dec 27 2017 10:21PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

मागील काही वर्षापासून सुस्तावलेल्या युवा आघाडीला ‘रिचार्ज’ करण्याचे प्रयत्न तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीकडून सुरू झाले आहेत. मागील महिन्यात नावगे येथे झालेल्या युवा कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर तालुक्यात युवा मेळावा घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. यासाठी येत्या काळात सक्रिय होण्याचे संकेत मिळाले आहेत. युवा आघाडीच्या माध्यमातून ‘पुन:श्‍च एकदा हरि ओम’ चा नारा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातून पुन्हा एकदा तालुक्यात युवा आघाडीचे वादळ घुमणार आहे.

येत्या चार महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी तालुक्यातील राजकीय फड रंगायला सुरुवात झाला आहे. हळदी-कुंकू, मेळावे, विकासकामांचा शुभारंभ, गाठीभेटी, आश्‍वासनांची खैरात, आर्थिक मदत, साड्या-भेट वस्तूंची देवाणघेवाण यांना ऊत आला आहे. यामध्ये सारेच राजकीय पक्ष गुंतले असून म. ए. समितीनेही शड्डू ठोकण्याची जोरदार तयारी चालविली आहे.
यातूनच युवा आघाडीला सक्रिय करण्याचे प्रयत्न समिती नेतृत्वाकडून सुरू आहेत. मागील महिन्यात नावगे येथे युवा कार्यकर्त्याची याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी युवकांचा कानोसा घेण्यात आला. उपस्थित युवकांनी मराठीच्या लढ्यासाठी युवकांना संघटित करण्याची हाक दिली. त्या माध्यमातून युवा मेळावा घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

एकेकाळी म. ए. समिती म्हणजे जुन्या कार्यकर्त्यांची संघटना अशी ओळख निर्माण झाली होती. राजकीय पक्षाकडून याप्रकारे हेटाळणीदेखील करण्यात येत असे. परंतु, हा समज फोल ठरविण्यासाठी 2009 च्या दरम्यान तालुक्यात युवा आघाडीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मराठी चळवळीशी  प्रामाणिक असणार्‍या युवकांच्या साथीने गावोगावी युवा आघाडीच्या शाखा सुरू केल्या. त्यामुळे म. ए. समितीच्या चळवळीत उत्साह संचारला. नवी ऊर्जा निर्माण झाली. युवा आघाडीने कार्यकर्त्यांची नवी फळी तयार करण्यात सुरुवातीच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र मध्यंतरी यामध्ये काही अंशी शिथिलता निर्माण झाली. चळवळीत सक्रिय झालेले युवक सुस्तावले होते.

त्यांना ‘चार्ज’ करण्यासाठी म. ए. समितीने कंबर कसली आहे. सध्या गावोगावी युवकांच्या बैठकी घेऊन प्रबोधन करण्यावर भर देण्यात येणार आहे. युवकांना म. ए. समितीच्या चळवळीशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन केले जाणार आहे. परिणामी युवकांमध्ये जोश निर्माण होणार असून राजकीय पक्षांकडे वळलेल्या युवकांची पावले पुन्हा एकदा म. ए. समितीकडे वळविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.