Sat, May 25, 2019 22:35होमपेज › Belgaon › यल्‍लम्मा डोंगरावर हवी रेल्वे सुविधा

यल्‍लम्मा डोंगरावर हवी रेल्वे सुविधा

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 11:16PMबेळगाव : प्रतिनिधी

यल्लम्मा डोंगरावर देवी रेणुकाच्या दर्शनासाठी देशभरातून अनेक भाविक येत असतात. यामध्ये नजिकच्या महाराष्ट्र राज्यातील भाविकांची अधिक भरणा असतो . याठिकाणी रेल्वेचा केवळ 70 कि. मी. मार्ग केल्यास भाविकांना याचा लाभ होऊ शकतो. यासाठी 50 टक्के निधी राज्य सरकार देण्यास तयार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री एच. के. पाटील यांनी केले.

धर्मादाय खाते, ग्रामविकास आणि पंचायतराज विभाग, रेणुका देवस्थान कमिटी यांच्यावतीने सोमवारी आयोजित कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते. यावेळी त्यांच्याहस्ते 136 कोटी विकासकामांचा शुभारंभ झाला. अध्यक्षस्थानी आ. आनंद मामनी होते. ते म्हणाले, रेल्वे मार्ग येत्या दोन वर्षात सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतील. याठिकाणी येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी पाणी, निवास आणि वाहतुकीची व्यवस्था सरकारतर्फे करण्यात येणार आहे. मूलभूत सुविधा पुरविण्यावर भर देण्यात आला असून या तीर्थक्षेत्राचा कायापालट केला जाणार आहे.याठिकाणी उद्यान निर्मितीसाठी 3 कोटीची आवश्यकता असून हा निधी पुरविण्यात येईल.

यावेळी खा. सुरेश अंगडी यांनीही रेल्वेमार्गासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानातून याठिकाणी योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.पालकमंत्री रमेश जारकीहोळी म्हणाले, यल्लाम्मा देवी हे सामान्य गरीब जनतेची कुलदेवता आहे. याठिकाणी विकासकामे राबविणे म्हणजे पुण्याचे काम आहे. येत्या काळात भाविकांना भेडसावणार्‍या समस्या सोडविल्या जातील. यावेळी धर्मादाय खात्याचे मंत्री रुद्रप्पा लमाणी यांनी मनोगत व्यक्त केले. आ. महांतेश कवटगीमठ, जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे , देवस्थान कमिटीचे सदस्य , देवस्थान कमिटीचे कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती आदी उपस्थित होते.देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामनगौड तिपराशी यांनी प्रास्ताविक, स्वागत केले. आभार कोटारगस्ती यांनी मानले.