Fri, Jul 03, 2020 04:47होमपेज › Belgaon › स्मार्टसिटीअंतर्गत दोन रस्त्यांचे काम सुरू

स्मार्टसिटीअंतर्गत दोन रस्त्यांचे काम सुरू

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 03 2017 10:35PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

अडीच वर्षे उलटूनही स्मार्ट सिटीतील कामांना सुरुवात होत नसल्याने नागरिकांमधून योजनेसंदर्भात शंका उपस्थित केल्या जात होत्या.दरम्यान बहुचर्चित स्मार्टसिटी योजनेतील कामांना रविवारी सुरुवात झाली आहे. नेहरुनगर आणि मंडोळी रस्ता सुधारणा कामांचा शुभारंभ पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आला.

उत्तर भागातील नेहरुनगर येथील केपीटीसीएल व दक्षिण भागातील काँग्रेस रोड ते मंडोळी दरम्यानच्या रस्ता सुधारणा कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. 2 रस्त्यांच्या सुधारणेसाठी 22.39 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये केपीटीसीएल 750 मीटर लांब आणि 24 मीटर रुंद तर काँग्रेस रोड ते मंडोळी 950 मीटर लांब व 24 मीटर रुंद रस्त्याची सुधारणा  करण्यात येणार आहे. डांबरीकरणाबरोबरच दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ, पाण्याची व्यवस्था, वीज जोडणी, नव्या पध्दतीचे एलईडी दिवे बसविण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त शशिधर कुरेर यांनी कामाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना दिली.

पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते रस्ताकामाचे भूमिपूजन करण्यात आले. आम. फिरोज सेठ.जिल्हाधिकारी झियाऊल्ला एस., व अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी ना. जारकीहोळी यांनी स्मार्टसिटी योजनेतील कामांना केंद्र सरकारबरोबरच राज्यशासनाने चालना दिली आहे. योजनेतील कामे चांगल्या पध्दतीने केली जावीत, याबाबत अधिकारी वर्गाला सूचना देण्यात आल्याचे सांगितले. आम. फिरोज सेठ यांनीही स्मार्टसिटीतील विकासकामांबाबत समाधान व्यक्त  केले.