Sat, Mar 23, 2019 18:08होमपेज › Belgaon › देशरक्षणात चंदगडकरांचे कार्य अविस्मरणीय

देशरक्षणात चंदगडकरांचे कार्य अविस्मरणीय

Published On: Dec 12 2017 2:03AM | Last Updated: Dec 11 2017 10:26PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

देशरक्षणात चंदगडकरांचे कार्य अविस्मरणीय आहे. विविधतेने नटलेल्या चंदगड तालुक्यातील अनेक मोहरे सैन्यदलात उच्चपदावर आहेत. हे सर्व कार्य करीत असताना 1971 च्या भारत- पाक युद्धात या तालुक्यातील सात जवान धारातार्थी पडले. त्यांच्या शौर्याला आमचा सलाम आहे, असे प्रतिपादन वेटेरेन्स हेड क्वॉर्टर्स महाराष्ट्र, गुजराथ, गोवाचे कर्नल राकेश सिंग चौहान यांनी केले. ते शहीद जवान शंकर  मणगुतकर यांच्या अर्ध पुतळ्याच्या अनावरण समारंभात बोलत होते.

1971 च्या भारत-पाक युद्धात शंकर मणगुतकर हे शहीद झाले. त्या प्रित्यर्थ त्यांना बक्षीसपत्र प्राप्त जागेत हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी चंदगडचे तहसीलदार शिवाजी शिंदे होते. शहीद शंकर यांच्या पत्नी कमळाबाई, स्टेशन हेडक्वार्टर्स, कोल्हापूरचे ले. कर्नल कावेरीअप्पा (अ‍ॅडम कमांडंट), नायब सुभेदार ए. पी. अस्वले, कृष्णा पाटील यांच्यासह पं. स. चंदगडचे सभापती जगन्नाथ हुलजी, चंदगड पोलिस निरीक्षक अशोक पवार, नागरदळेचे सरपंच दिलीप पाटील, तुडीयेचे सरपंच शिवाजी कांबळे, हाजगोळीच्या सरपंच वर्षा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कर्नल चौहान यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सुभेदार बाबू मरुचे यांच्या नेतृत्वाखालील  बेळगाव मराठा लाईट इन्फंट्रीच्या तुकडीने  शस्त्रसलामी दिली. प्रास्ताविकात हवालदार शिवाजी पाटील (नागरदळे) यांनी शहीद जवान शंकर मणगुतकर,  अनिल सिपेकर (कौलगे), परशराम पाटील (कालकुंद्री), मारुती मडलगेकर (म्हाळेवाडी), दत्तात्रय आवडण (हलकर्णी), दादू शिंदे (चंदगड), मारुती सुळेभावकर (किटवाड) यांच्या 1971 युद्धातील स्मृतींना उजाळा दिला.

वीरपत्नी कमळाबाई मणगुतकर म्हणाल्या, शंकररावांनी देशासाठी प्राण अर्पण केला. याचा मला अभिमान आहे. त्यांच्या धाडसी पराक्रमाची तरुणांनी प्रेरणा घ्यावी. यावेळी तहसीलदार शिंदे, जगन्नाथ हुलजी, शहीद जवान शंकर यांचे चिरंजीव शंकर, यांच्यासह वीर माता, वीर पीता, यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रताप उसके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा. डॉ. दीपक पाटील, प्रा. डॉ. व्ही. आर. पाटील, प्रा. डॉ. एस. एन. कांबळे, माजी पं. स. सभापती यशवंत  सोनार नागरदळे सेवा संस्थेचे चेअरमन राजेश माणकोजी पाटील, व्हा.चेअरमन मारुती पाटील, सचिव नारायण हदगल, जकणू मुरकुटे, नागरदाळे उपसरपंच रामू पाटील,  एम. बी. बाचूळकर, डॉ. अरुण मणगुतकर, विठ्ठल माणगावकर, शिवाजी आपटेकर उपस्थित होते.