Tue, Jul 16, 2019 13:37होमपेज › Belgaon › महिलांनी कार्याचा परीघ विस्तारावा

महिलांनी कार्याचा परीघ विस्तारावा

Published On: Jan 30 2018 1:55AM | Last Updated: Jan 29 2018 8:25PMबेळगाव : प्रतिनिधी

आजच्या काळात आव्हानांचे स्वरूप बदलत चालले आहे. त्यानुसार प्रत्येक महिलेने सक्षम होण्याची गरज आहे. महिलांनी केवळ चूल आणि मूल यामध्ये गुरफटून न पडता नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सिद्ध व्हावे. आपल्या कार्याचा परीघ विस्तारण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन भरतेश महाविद्यालयाच्या प्रा. राजश्री मिसाळे यांनी केले. हिंडलगा येथे तालुका म. ए. समिती महिला आघाडी आणि ग्रामीण महिला सोसायटीच्या माध्यमातून लक्ष्मी चौकात महिला मेळावा आणि हळदीकुंकू कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी सोसायटीच्या चेअरमन नयन किणेकर होत्या.

सावित्रीबाई फुले प्रतिमापूजन जि. पं. सदस्या माधुरी हेगडे तर राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिमापूजन  माजी जि. पं. सदस्या प्रेमा मोरे यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलन प्रा. राजश्री मिसाळे, ता. पं. सदस्या काजल महागावकर, कमल मन्नोळकर यांनी केले. प्रा. मिसाळे म्हणाल्या, शिक्षणामुळे महिलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण होतो. आव्हानांना भिडण्याची ताकद येते. यासाठी महिलांनी अधिकाधिक शिक्षण घेऊन सक्षम होण्याचा प्रयत्न करावा. आपली संस्कृती जपण्याची जबाबदारी महिलांवर अधिक आहे. यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन  मुलांवर संस्कार करावेत.

विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राजकीय पक्षांकडून आमिषे दाखविण्यात येत आहेत. यासाठी प्रत्येक मराठी माणसाने सावध होण्याची गरज आहे. काही पुतनामावशीकडून पैसा आणि साड्यांची खैरात करण्यात येत आहे. हे धोकादायक आहे. सीमाप्रश्‍नाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत म. ए. समितीच्या झेंड्याखाली मराठी माणसांनी एकसंध राहावे. माजी ता. पं. सदस्या कमल मन्नोळकर म्हणाल्या, महिलांनी संघटित राहिल्यास अन्यायाचा प्रतिकार करणे शक्य होते. यासाठी महिलांनी समितीच्या झेंड्याखाली संघटित राहावे. राजकीय पक्षांकडून मराठी माणसांचा वापर करून घेण्यात येत असून मराठी युवकांनी सावध व्हावे.

जि. पं. सदस्या माधुरी हेगडे, नयन किणेकर, ग्रा. पं. उपाध्यक्षा गीता चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. ता. पं. सदस्या काजल महागावकर, ग्रा. पं. सदस्या राजश्री शिंदे व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सूत्रसंचालन रवी तरळे यांनी केले. आभार कुप्पेकर यांनी मानले.

प्रेमा मोरे ...
महिला आता अबला नाहीत. त्या सबला झाल्या आहेत. त्यांच्यामध्ये संकटाशी भिडण्याची ताकद निर्माण झाली आहे.े महिलांनी समाजाला भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.