Thu, May 23, 2019 20:24
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › सीमालढ्याला महिलांनी बळ द्यावे

सीमालढ्याला महिलांनी बळ द्यावे

Published On: Jan 22 2018 1:25AM | Last Updated: Jan 21 2018 11:31PMबेळगाव : प्रतिनिधी

सीमालढ्याची पालखी आजवर अनेकांनी आपल्या खांद्यावर वाहून आणली आहे. यामुळेच हा लढा अद्याप धगधगत आहे.  महिलांनी भावी पिढी लढ्यामध्ये सक्रिय होण्याची प्रेरणा द्यावी. त्यातूनच लढ्याची धार वाढेल. सीमालढ्याला बळ देण्याचे काम महिला अधिक सक्षमपणे बजावू शकतात, असे मत कार्वे (ता. चंदगड) येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्रा. गीता मुरकुटे यांनी मांडले.

सावगाव येथे म. ए. समिती महिला आघाडी आयोजित महिला मेळावा आणि हळदीकुंकू कार्यक्रमात प्रा. मुरकुटे प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी लता पावशे होत्या. प्रा. मुरकुटे म्हणाल्या, सीमालढ्याचं बीज मुलांमध्ये पेरण्याचे काम महिलांना करावे लागणार आहे. हा लढा भावी पिढीकडे जाताना अधिक सक्षमपणे जाणे अत्यावश्यक आहे. यासाठी महिलांनी संस्कार घडविण्याचे काम हाती घ्यावे.

जन्माला आल्यानंतर आपण आपल्या मातीचे, भाषेचे, समाजाचे देणे लागतो, याचे भान ठेवावे. सामाजिक बांधिलकी जपून समाजसेवेला महत्त्व द्यावे. विज्ञानाच्या प्रसारामुळे भौतिक प्रगती झाली. मात्र, नातेसंबंध विरळ होत चालले आहेत. आपुलकीचे बंद पातळ होत आहेत. संवाद हरवत आहे. यातून आपण एकमेकांपासून दूर जात असल्याची शंका येते, अशी खंत व्यक्‍त केली.

आर्थिक समृद्धीमुळे वास्तू सुशोभित होत आहेत. मात्र, संवाद हरवत चालला आहे. यासाठी भौतिक बाबींपेक्षा विचारांची उंची वाढवावी लागणार आहे. 
प्रत्येक मातेनेे मुलांवर संस्कार घडविण्यासाठी ‘शामची आई’ होण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी चांगल्या विचारांची जोपासना करावी.  यासाठी पुस्तकाशी मैत्री करा. चांगली पुस्तक विचार समृद्ध करतात.  यासाठी मुलांवर संस्कार पेरत चला. 

माजी जि. पं. सदस्या प्रेमा मोरे म्हणाल्या, कर्नाटक सरकारची झोटिंगशाही वाढत आहे. यामुळे सीमाबांधवांनी हतबल न होता लढा अधिक तीव्र करावा . यासाठी मराठी बांधवांनी एकत्र यावे. स्वार्थासाठी स्वाभिमान गहाण टाकू नये. अध्यक्षा लता पावशे म्हणाल्या, सीमालढ्यात आपण अतिशय लहान वयापासून आहे. लढ्यासाठी एकजूट कायम ठेवणे अत्यावश्यक आहे. हा लढा सुटेपर्यंत मराठी जनतेने एकजुटीने राहावे. यावेळी बस्तवाड येथील महिला कुस्तीपट्टू शितल संजय पाटील व सावगाव येथील खेळाडू अंकिता सुनील मुंगले यांचा अरुंधती महाडिक यांच्याहस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .

यावेळी माजी आ. मनोहर किणेकर, युवा आघाडी अध्यक्ष अ‍ॅड.  शाम पाटील, उपाध्यक्ष दत्ता उघाडे, आर. आय. पाटील, माजी ता. पं. सदस्या तुळसा पाटील, मीनाक्षी वेताळ, सुनीता बुवा, कमल मन्नोळकर, ज्योती गवी यांच्यासह तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.