Mon, Apr 22, 2019 15:55होमपेज › Belgaon › एचआयव्हीग्रस्तांच्या सान्निध्यात लग्नगाठ

एचआयव्हीग्रस्तांच्या सान्निध्यात लग्नगाठ

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 11:18PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

एका बाजूला लग्नसोहळ्यावर भरमसाट खर्च केला जातो. जगाला उपदेशाचे डोस देणारेच आपल्या घरातील मंगलकार्यात वारेमाप खर्च करतात. याउलट कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करता चि.सौ.कां. स्नेहल आणि चि. गजानन यांनी महेश फाऊंडेशनमधील एचआयव्ही बाधितांच्या साक्षीने लग्नाची गाठ बांधून समाजासमोर आदर्श निर्माण केला.

पांगुळ गल्ली येथील गजानन माने व खडक गल्ली येथील स्नेहल डावरे यांनी रविवारी कणबर्गी येथील महेश फाऊंडेशनच्या कार्यालयात एकमेकांनी वधूवर म्हणून स्वीकार केला. फाऊंडेशनमधील ती 36 मुले, कर्मचारी वधू-वराचे वर्‍हाडी व निवडक मित्रमंडळींच्या सहवासात मंगलमय विवाह सोहळा पार पडला. विवाहाच्या निमित्ताने नवदाम्पत्याने फाऊंडेशनला भेटवस्तूही देऊन  आपुलकी व्यक्त केली.
गजानन हा चॉकलेट कंपनीचा सेल्समन तर वधू स्नेहल दवाखान्यात सेवा बजावते.

या दोघांच्या अनोख्या विवाहासाठी वराचे मामा राजू माने यांनी पुढाकार घेतला. त्यांना निपाणीचे बाळासाहेब कामते, मोतेश बार्देशकर, बाळू चौगुले, विनायक नेसरीकर व अन्य मित्रांची साथ मिळाली. फाऊंडेशनचे संस्थापक महेश जाधव व त्यांची पत्नी मधु यांनीही या कार्याला सहकार्य केले.