Sun, Feb 23, 2020 11:15होमपेज › Belgaon › ट्रिपल सीट, मोबाईल संभाषण धोक्याचे

ट्रिपल सीट, मोबाईल संभाषण धोक्याचे

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 8:05PMबेळगाव  ;  प्रतिनिधी

शहर परिसरात सर्रास दुचाकीस्वारांकडून ट्रिपल सीट वाहतूक व गाडी चालविताना मोबाईलवरून संभाषण करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशांकडे पोलिसांचे दुर्लक्ष दिसून येते. अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांकडून कारवाईची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे. दीड महिन्यापासून शहरात हेल्मेटसक्ती तीव्र करण्यात आली आहे. वाहतूक पोलिस हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाईत मग्‍न आहेत. ट्रिपल सीट वाहतूक व मोबाईलवर  बोलणार्‍या दुचाकीस्वारांकडे त्यांचे दुर्लक्ष दिसून झाले आहे. अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी ठोस उपयायोजना आखणे गरजेचे असल्याचे बोलले जाते.

शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवरील बेताल वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. दिवसेंदिवस रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढत असल्याने वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, ट्रिपलसीट वाहन चालविणे, सिग्नल तोडून भरधाव जाणे, वाहतूक नियमांचे  उल्लंघन हे नित्याचेच झाले आहे. नियमांचे सर्रास होणारे उल्लंघन वाहनचालक आणि पादचार्‍यांच्या जीवावर बेतते. वाहतूक पोलिस कारवाई करतात, परंतू त्याचा चालकांवर प्रभावी परिणाम होताना दिसत नाही. वाहतूक नियमांचे योग्य पालन होण्यासाठी कडक कारवाई करून चालकांना वठणीवर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. वाहतूक नियमांचे पालन करणे सुरक्षेसाठी आवश्यक असल्याची जाणीव चालक आणि पादचार्‍यांना झाली पाहिजे.

जीव महत्त्वाचा की वेळ?

सिग्नल तोडून चौकातून भरधाव जाणे, ही तर फॅशनच झाली आहे. हे प्रमाण युवक, युवतींमध्ये अधिक आहे. सिग्नलवर काही सेकंद थांबण्यास चालकांजवळ वेळ नसतो. सिग्नलवरील वेळ पूर्ण होण्याच्या आधीच सुसाट वाहने पळविली जातात. 

ट्रिपलसीट आमचा हक्कच 

शहरात ट्रिपल सीट वाहन चालविण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पोलिसांच्या डोळ्यादेखत अनेक जण ट्रिपल सीट दुचाकी दामटतात. पोलिसांनी अडविले तर कोणत्या राजकीय नेत्याची, पोलिस अधिकार्‍याची ओळख सांगून, फोनवरून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला जातो. वाहतूक पोलिसही उगाच वाद नको म्हणून अशांना सोडून देतात. दुचाकीस्वार मोबाईलवरून बोलणे व ट्रिपल सीटमुळे अपघाताची शक्यता असते. त्यांच्याकडून नेहमीच नियमांचे उल्लंघन केले जाते. वाहतूक पोलिसांनीही लक्ष देणे गरेजेचे आहे. 

 - राहुल पाटील, दुचाकीस्वार