Mon, Aug 19, 2019 09:30होमपेज › Belgaon › केळकरबाग विहिरीच्या पाण्याकडे दुर्लक्ष

केळकरबाग विहिरीच्या पाण्याकडे दुर्लक्ष

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 7:41PM

बुकमार्क करा
बेळगाव : महेश पाटील 

प्यास फाऊंडेशनमार्फत केळकरबागमधील पोलिस चौकी शेजारील सार्वजनिक विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. परिसरातील आठ गल्ल्यांना पाणीपुरवठा होईल इतका साठा विहिरीत उपलब्ध आहे. मात्र पाणी शुद्धीकरण प्रकल्प बसविण्याबाबत महापालिकेने ठोस भूमिका घेतलेली नाही. यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. केळकरबागमध्ये सध्या पाणी समस्या नाही. काही दिवसापूर्वीच या ठिकाणी नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू असतानाही नव्याने नळाद्वारे पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. ते नळही गटारीमधून घातलेले आहेत. त्यामुळे प्यास फाऊंडेशनने स्वच्छता केलेल्या या विहिराचा उपयोग होणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

 येथील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या दडपणाखाली मनपाने एकाच ठिकाणी तीन नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्याचा आरोप होत आहे. वास्तविक ज्या ठिकाणी नळाची आवश्यकता नाही, अशा ठिकाणी सार्वजनिक नळ बसविण्यात आले आहेत. जनतेऐवजी भाजी विक्रेत्यांना याचा लाभ होत आहे. त्यामुळे रहिवाशातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. केळकरबाग येथील कन्नड शाळा आणि वैशाली बारच्या शेजारी असलेल्या सार्वजनिक विहिरीचे प्यास फाऊंडेशनच्या माध्यमातून डॉ. माधव प्रभू यांनी पुनरुज्जीवन केले आहे. जवळपास महिनाभर 25 कामगारांच्या साहाय्यातून विहीर स्वच्छ करून स्वच्छ पाणी उपलब्ध करण्यात आले. महापालिकेने या विहिरीवर स्वच्छ पाणीपुरवठा करणारे यंत्र बसवून परिसरातील गल्ल्यांना पाणीपुरवठा केल्यास वर्षभर पाणीसमस्या सुटणार आहे. मात्र  सामाजिक कार्यकर्ता या ठिकाणी व्यायामशाळा उभारण्यासाठी प्रयत्नात असून तो सर्वांची दिशाभूल करीत असल्याची चर्चा आहे.

‘प्यास’ने प्रयत्न करून विहिरीची स्वच्छता केली. यात पुन्हा जाणीवपूर्वक कचरा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी फाऊंडेशनने विहिरीवर जाळी बसविली आहे. पण  दगड, विटा आणि कचरा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. महापालिका आणि पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे. परिसरात बरेचशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यानुसार समाजकंटकांवर कारवाईची मागणी होत आहे. दत्तमंदिरपासून बाकीच्या गल्ल्यांमध्ये पेव्हरब्लॉक बसविले आहेत. काही ठिकाणी डांबरीकरण झाले आहे. मात्र फाऊंडेशनने स्वच्छ केलेली विहीर आणि त्या बाजूची जागा बळकाविण्याकरिता प्रयत्न सुरू असल्याची वदंता आहे.