होमपेज › Belgaon › हनुमाननगरसह उपनगरांमध्ये पाणीटंचाई

हनुमाननगरसह उपनगरांमध्ये पाणीटंचाई

Published On: Feb 10 2018 1:28AM | Last Updated: Feb 09 2018 11:43PMबेळगाव : प्रतिनिधी 

बेळगाव शहरामधील काही उपनगरांमध्ये व विशेष करून हनुमाननगर आणि माळमारूती विभागात पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होत आहे. स्मार्ट शहर म्हणून बेळगाव शहराचा विकास होत असला तरी पाणी पुरवठ्यासंदर्भात दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. आठवड्यातून एकदा उपनगरांमध्ये पाण्याचा पुरवठा होत असल्याने आतापासूनच महापालिका, पाणी पुरवठा मंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यास प्रारंभ झाला आहे.  

बेळगाव उत्तर मतदारसंघामध्ये येणार्‍या महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील हनुमाननगर, सह्याद्रीनगर, कुवेंपूनगर, टीव्ही सेंटर आदी भागात गेल्या काही दिवसांपासून तब्बल दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे महिलांना आठवडाभर पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता खंडित वीजपुरवठा, पाईपलाईनला लागलेली गळती आदी कारणे देण्यात येत आहेत. स्मार्ट सिटी म्हणून घोषित करण्यात आलेल्या शहरामधील उपनगरांमध्ये दहा दिवसांतून पाणी पुरवठा होत असल्याने नाराजीचा सूर उमटला आहे. 

महापालिकेच्या एकूण 58 प्रभागांपैकी 10 प्रभागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा सुरू ठेवलेला आहे. यासाठी जागतिक बँकेने घालून दिलेल्या अटीनुसार या प्रभागामध्ये  णीपुरवठ्यात कधीही व्यत्यय केला जात नाही. मात्र, शहरासह उपनगरांमध्ये  पाणीपुरवठ्यात सातत्याने व्यत्यय निर्माण होत आहे. अपुर्‍या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ या परिसरातील नागरिकांनी बर्‍याचवेळा महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून निवेदने देण्यात आली आहेत. तरीही यामध्ये सुधारणा झालेली नाही. 
हनुमाननगर, कुवेंपूनगर, टीव्ही सेंटर, माळमारूती विभाग हा परिसर बेळगाव उत्तर मतदारसंघाचे विद्यमान आ.फिरोज सेठ यांच्या व्याप्‍तीत येतो.

त्यांचे स्वत:चे निवासस्थानही याच विभागात आहे. तरीही पाणी पुरवठ्याबाबतीत सुधारणा झालेली नाही. अपुर्‍या पाणीपुरवठ्याचा लाभ टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार्‍या खासगी टँकर चालकांकडून उठविला जात आहे. प्रत्येक टँकरमागे 400 ते 600 रू. दराची आकारणी केली जात आहे. आठवड्यातून किमान तीनवेळा तरी टँकरद्वारे पाणी मागवावे लागत असल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. जिल्हा प्रशासन आणि पाणीपुरवठा महामंडळाने याबाबत त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. 

प्रभाग क्रं.40 मधील पाणी समस्या संदर्भात सातत्याने पाणीपुरवठा महामंडळ आणि महापालिकेला सूचना देऊनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. बसवणकोळ येथे जलशुद्धीकरण प्रकल्प स्थापन करण्यात आला असून 20 एचपी विद्युत पंप बसविण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व भागात पाणीपुरवठा सुरळीत होणे गरजेचे आहे. त्यामुळे याला सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहेत.            

अनुश्री देशपांडे,  नगरसेविका


बेळगावमधील काही प्रभागांत सहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हिडकल आणि राकसकोप जलाशयांमधून पाणीपुरवठा करणार्‍या यंत्रणेत तांत्रिक अडचण निर्माण होत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुढे दोन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 

करियप्पा कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा महामंडळ