Sun, Aug 25, 2019 03:38होमपेज › Belgaon › जागेअभावी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प रखडला

जागेअभावी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प रखडला

Published On: Dec 12 2017 2:04AM | Last Updated: Dec 11 2017 8:29PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

शहरातील सांडपाणी महापालिकेने अनेक वषार्ंपासून बळ्ळारी नाल्यामध्ये सोडले आहे. यामुळे नाला परिसरातील भूजल दूषित बनले आहे. शहरातील भुयारी गटार योजना अनेक भागात निकामी बनल्याने विहिरींमध्ये सांडपाणी झिरपल्याने त्यांचे पाणी दूषित बनले आहे. भुयारी गटार योजनेचे नूतनीकरण व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासाठी शहराचा समावेश केंद्र सरकारच्या ‘अमृत सिटी’ योजनेत करण्यात आला असून याखाली 200 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. 

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी मनपाने हलगा व्याप्तीमधील 19 एकर जमीन संपादन करण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु शेतजमीन देण्यासाठी तेथील शेतकर्‍यांनी व शेतकरी संघटनेने जोरदार विरोध करून कर्नाटक उच्च न्यायालयामध्येही खटला दाखल केला आहे. यामुळे प्रकल्प रेंगाळला आहे. हलगा येथील शेतकर्‍यांनी हिवाळी अधिवेशनावेळी नगरविकासमंत्री रोशन बेग यांना भेटून जमिनीसंबंधीचे संपादन रद्द करण्याची मागणी केली. केंद्र सरकारच्या शेती विकास खात्याकडेही शेतकर्‍यांनी पिकाऊ शेतजमीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी घेऊ नये, अशी मागणी केली आहे. 

या प्रकल्पासाठी मनपाने 1985 साली अलारवाड येथे 195 एकर जमीन संपादन केली. शिवाय तेथे सांडपाणी प्रकल्प राबविण्यासाठी मनपाने त्या ठिकाणी पाईपलाईन घालण्यासाठी 7 ते 8 कोटींचा खर्च केला. तेथील जमीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठीच संपादन केली होती. त्याच ठिकाणी तो प्रकल्प राबवावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते नारायण सावंत व शेतकर्‍यांनी केली आहे.
ऊठसूठ शेतकर्‍यांची पिकाऊ जमीन हिसकावण्याचा प्रयत्न राजकारण्यांनी चालविल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. एकदा एका प्रकल्पासाठी भू-संपादन करून जमीन ताब्यात घेतली असेल तर त्याच ठिकाणी मनपाने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविला पाहिजे, असे सावंत यांचे म्हणणे आहे. प्रकल्पासाठी मनपाला आता हलगा येथील 19 एकर शेतजमीन मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे प्रकल्प वर्षानुवर्षे रेंगाळला आहे.

अमृत सिटी योजनेखाली शहरातील मुख्य भुयारी गटार योजनेचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. परंतु ते कामही रेंगाळले आहे. धामणे रोड वडगाव येथून गेलेली ड्रेनेज लाईन बदलण्याचा निर्णय मनपाने दोन वषार्ंपूर्वीच केला आहे. परंतु त्या कामाचा शुभारंभ कधी होणार, हे तरी मनपाने जाहीर करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. धामणे रोड येथील निकामी बनलेल्या भुयारी गटार लाईनमुळे त्या भागातील सर्वच नागरिकांच्या विहिरींना दूषित पाणी आल्याने पाण्याचा वापर बंद करण्यात आलेला आहे.