Wed, Apr 24, 2019 22:01होमपेज › Belgaon › १५ हजार द्या....आश्रय घर घ्या!

१५ हजार द्या....आश्रय घर घ्या!

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 03 2017 8:47PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या सदस्यांकडून ग्रामस्थांना लुटण्याचा प्रकार सुरूच आहे. आश्रय योजनेतून घर मंजूर करून देण्यासाठी ग्रा. पं. सदस्य नागरिकांच्या घरोघरी  जाऊन घर घेता का घर, अशी विचारणा करीत आहेत. आश्रय घरासाठी 5 हजारपासून 15 हजार आगाऊ रक्कम वसूल करून नागरिकांना घराचे आमिष दाखवून वसुलीचा धंदा चालविल्याची चर्चा  आहे. तालुक्याच्या अनेक गावांमध्ये हा प्रकार सुरू असून ग्रामस्थाूंन चर्चा केली जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारसंघातील आमदारांच्या चेल्यांकडून हा प्रकार सुरू आहे.  विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम आतापासूनच सुरू करण्यात आली आहे. निवडणुका लवकरच होणार असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीला आमदारांकडून 100 आश्रय घरे मंजूर करून देण्यात येणार आहेत, असे सांगून गावागावांतील ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांची पैसे घेऊन लूट चालविली आहे. अनेकजण आमिषाला बळी पडून कर्ज काढून पैसे  देत आहेत.

यामुळे घरे खरोखरच उपलब्ध होणार का, हा प्रश्‍नच आहे. शहराजवळील ग्रामपंचायतींमध्ये हा प्रकार सुरू आहे. ग्रामीण व यमकनमर्डी मतदारसंघातील तालुक्यापासून जवळ असणार्‍या गावांमधील सदस्यांनी हा उद्योग चालवला आहे. आश्रय घराची निकड असणार्‍यांना हेरून ग्रा. पं. सदस्यांनी सावज बनविले आहे. वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये वेगवेगळी रक्कम स्वीकारली जात 
आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील व शहरापासून जवळ असणार्‍या ग्रामपंचायतींमध्ये 3 ते 5 हजार रुपये रक्कम घेतली जात आहे. तालुक्याच्या उत्तर भागातील ग्रामपंचायत सदस्यांनी यासाठी 5 ते 15 हजाराची रक्कम सांगून ग्रामस्थांची लूट चालविली आहे.

कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायतींना घरकुल योनजने संदर्भातील अधिसूचना  जारी झाली नसतानाही लूटमारीचा प्रकार सुरू आहे. निवडणुका लवकरच होणार असल्याने सरकार ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात आश्रय योजनेतून घरे मंजूर करणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या आधारावर व अतिशय गरीब, विधवा, भूमीहिन नागरिकांना घरे मंजूर करणार आहेत. यासाठी आधी रक्कम भरावी लागणार आहे. यासाठीच आगाऊ रक्कम भरून घेण्यात येत आहे, असे सांगून ग्रा. पं. सदस्यांनी नागरिकांची दिशाभूल करून लूट आरंभली आहे. घरासाठी पैसे देणार्‍या नागरिकांकडून केवळ आधारकार्ड पुरावा घेण्यात येत आहे.

या आधारवरच घर मंजूर केले जाणार आहे, असे सांगण्यात येत आहे. घर नाही मिळाल्यास पैसे परत देऊ, असे आश्‍वासनही देण्यात येत आहे. यापूर्वी घरकुल योजनेतून घर मिळवून देण्यासाठी दिलेले पैसे परत न मिळाल्याने अनेकजण फशी पडले आहेत. याचा अनुभव घेतलेल्या नागरिकांकडून सावध भूमिका घेण्यात येत आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी आमदारांच्या नावाचे वजन वापरून  वसुली चालविली  आहे.