Wed, Mar 27, 2019 01:57होमपेज › Belgaon › उद्घाटन एपीएमसीचे आव्हान व्यापारी स्थलांतराचे 

उद्घाटन एपीएमसीचे आव्हान व्यापारी स्थलांतराचे 

Published On: Jan 30 2018 1:55AM | Last Updated: Jan 29 2018 8:28PMबेळगाव : प्रतिनिधी

एपीएमसी बाजारपेठ आवारातील नूतन भाजी मार्केटचा उद्घाटन सोहळा थाटात झाला. ‘ही बाजारपेठ राज्यात आदर्श ठरेल’, असा विश्‍वास आ. सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे. या बाजारपेठेत व्यवसाय सुरू करून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याचे आव्हान नेते आणि बाजारपेठ समितीसमोर आहे. उद्घाटन सोहळ्याला काही नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, विरोध करणार्‍या व्यापार्‍यांचे मार्केटमध्ये स्थलांतर करण्याचे आव्हान निर्माण झाले असल्याची चर्चा सुरू आहे.

विद्यमान व यापूर्वीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती व काही नेत्यांच्या अथक प्रयत्नातून शेतकर्‍यांना हक्काची बाजारपेठ मिळावी. दलालांकडून शेतकर्‍यांची होणारी फसवणूक थांबावी, शेतकर्‍यांना न्याय मागण्यास संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठ आवारात 13 एकर जागेत भव्य भाजीपाला विक्री बाजार उभारण्यात आला. शासनानेही मोठी आर्थिक मदत दिली. भाजी मार्केट एपीएमसीत स्थलांतरित करण्यात यावे, यासाठी यापूर्वी एपीएमसी सदस्यांकडून प्रयत्न करण्यात आले होते.

मात्र या बाजारपेठेला किल्ला येथील भाजी व्यापारी  संघटनेने विरोध दर्शविला होता. त्यानुसार या व्यापारी संघटनेने स्वतंत्र बाजारपेठ उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. याला काही राजकीय व्यक्तींचा वदरहस्त आहे.त्यामुळे हे व्यापारी एपीएमसी बाजारपेठेत येतील का, असा प्रश्‍न सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांतून उपस्थित करण्यात येत आहे.  यामुळे एपीएमसी बाजारपेठ आवारातील भाजी मार्केटमध्ये भाजीपाला विक्री प्रक्रियेला गतीने चालना मिळणार का, हाही प्रश्‍नच आहे. शहरातील किल्ला येथील भाजीपाला विक्री संघटनेने एपीएमसी भाजी मार्केटला विरोध दर्शवून महामार्गाशेजारी नवे मार्केट उभारण्यास सुरुवात केली आहे.

मात्र विविध कारणांनी सदर मार्केटच्या बांधकामाला प्रशासनाने निर्बंध घातल्याने बांधकाम ठप्प झाले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून व्यवसाय करणारे दलाल नूतन भाजी मार्केटमध्ये येण्यास तयार होतील का, हा प्रश्‍न ऐरणीवर आहे. यामुळे एपीएमसी आवारातील बाजारपेठेत भाजी विक्री सुरू करण्याचे मोेठे आव्हान असणार आहे. एपीएमसी व्यापारी संघटनेने भाजीमार्केट व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेऊनच आवारात भाजीमार्केट सुरू केले आहे. याला काही व्यापार्‍यांनी विरोध दर्शविल्याने भाजी मार्केटला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावे लागणार आहे.

एपीएमसी सचिव गुरुप्रसाद ...

किल्ला भाजीमार्केट व्यापारी संघटनेला एपीएमसी आवारातील नूतन भाजीमार्केटमध्ये येण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. याला अनेक व्यापार्‍यांनी प्रतिसाद दिला आहे. व्यापारी संघटनेकडून भाजीमार्केट उभारण्यात येत असले तरी तो त्यांचा प्रश्‍न असून एपीएमसीकडून करावे लागणारे प्रयत्न झाले आहेत. लवकरच गाळ्यांची लिलाव प्रक्रिया राबवून मार्केट व्यापार्‍याला सुरुवात करण्यात येणार आहे.