होमपेज › Belgaon › अनधिकृत बांधकाम पाहणी; अधिकार्‍यांची भंबेरी

अनधिकृत बांधकाम पाहणी; अधिकार्‍यांची भंबेरी

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 14 2017 12:09AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

शहर व उपनगरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. अनधिकृत बांधकामांना आवर घालण्यात महापालिकेला अपयश आले आहे. यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामांचा विषय गंभीर बनला आहे. या पार्श्‍वभूमीवर बांधकाम स्थायी समितीच्या वतीने बुधवारी अनगोळ आणि टिळकवाडीत अशा बांधकामांची पाहणी करण्यात आली. स्थायी समितीच्या  अचानक दौर्‍यामुळे अधिकार्‍यांची भंबेरी उडाली. 
शहरातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात बोलावलेल्या स्थायी समितीच्या बैठकीला अभियंते गैरहजर राहिले.

अनधिकृत बांधकामांच्या कामांसंदर्भात दै. ‘पुढारी’ने वृत्तांत प्रसिद्ध केला होता. काही वर्षांपासून शहरातील अनधिकृत बांधकामे आणि बेकायदा नव्या वसाहतींबाबत सातत्याने चर्चा होत आहे. अशा बांधकामांना राजकीय नेत्यांबरोबर मनपा अधिकार्‍यांचीही साथ मिळाल्याची टीकाही होते. मनपा सभागृहात अनेकवेळा चर्चा होऊनही बेकायदेशीर बांधकामांना लगाम घालण्यात साफ अपशय आले आहे. 
अभियंत्यांच्या नाकर्तेपणामुळे अनधिकृत बांधकामे सुसाट आहेत. यामुळे बांधकाम स्थायी समिती आणि सर्वसाधारण बैठकीत अभियंत्यांवर  जोरदार टीका केली जाते. मात्र, बेजबाबदार अभियंत्यांवर कारवाईचे धाडस सभागृहाने दाखविलेले नाही. यामुळे बांधकामांवरील चर्चेला अभियंते महत्त्व देत नसल्याचे दिसून येते.

मंगळवारी झालेल्या बैठकीला अभियंत्यांनी दांडी मारली. त्यामुळे अनधिकृत बांधकामाच्या विषयाला फाटा देऊन बैठक उरकण्यात आली. काही सदस्यांनी अभियंत्यांच्या भूमिकेला तीव्र आक्षेप घेतला.
स्थायी समिती अध्यक्ष पिंटू सिद्दिकी यांना अनधिकृत बांधकामांसंदर्भात गंभीर विचार करण्याची सूचना केली. बुधवारी बांधकाम स्थायी समितीने अचानक बांधकाम पाहणीचा दौरा आखला. शहर दक्षिण भागातील अभियंत्यांना दौर्‍याची माहिती कळविण्यात आली. अनगोळ मुख्य रस्ता, तसेच टिळकवाडीतील सोमवार पेठ, शुक्रवार पेठ भागात सुरू असलेल्या बांधकामांची पाहणी करण्यात आली. बांधकामधारकांकडून कागदोपत्री माहिती घेण्यात आली. बांधकामांच्या जागेची 

पाहणी केली. यानंतर काही अनधिकृत बांधकामांची समिती सदस्यांनी दुरूनच पाहणी  केली आहेे. बांधकामांची सविस्तर माहिती मिळाल्यानंतर कारवाईबाबत ठरणार  आहेे. या दौर्‍यात स्थायीचे अध्यक्ष सिद्दिकी, सदस्य राकेश पलंगे, मधुश्री पुजारी, मीनाक्षी चिगरे, जयश्री माळगी, जनगौडा, अभियंते आर.एच. कुलकर्णी, मुत्याण्णावर व अन्य अधिकारी होते. दौर्‍याची माहिती मिळाल्यामुळे दक्षिण भागातील बीट ऑफिसमधील कर्मचारी आणि अधिकारी हबकून गेले.