Fri, Jul 19, 2019 07:10होमपेज › Belgaon › महिलांसाठी स्वच्छतागृहांची वानवा

महिलांसाठी स्वच्छतागृहांची वानवा

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 05 2017 10:04PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी 

शहरात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपक्रम राबवावेत, अशी  मागणी केली जात असते. यामध्ये शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहे नसल्याबद्दल सातत्याने चर्चा होत असते. महापालिकेतही यावर अनेक वेळा चर्चा झाली. मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली होती. मात्र ती अडगळीत गेली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, ता. पं. कार्यालय, जि. पं. कार्यालय आदी ठिकाणी परगावाहून येणार्‍या महिलांना स्वच्छतागृहांची कल्पना नसते. त्यामुळे त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. शहरासह टिळकवाडी, शहापूर, वडगाव, अनगोळला महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात आली नाहीत. यामुळे महिलांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मध्यंतरीच्या काळात जिल्हा प्रशासनाने महिलांसाठी स्वच्छतागृहे उभी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालीच नाही. 

महिलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली नसल्याबद्दल मनपा सभागृहात  अनेकवेळा चर्चा झाली. नगरसेविका मेघा हळदणकर यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. महापालिकेमध्ये या विषयावर चर्चा झाली. मात्र स्वच्छतागृह बांधण्याचा विषय नेहमीप्रमाणे मागे राहिला. बेळगावसारख्या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या शहरामध्ये परराज्यातून तसेच आजूबाजूच्या गावांमधून मोठ्या संख्येने महिला खरेदीसाठी व अन्य कामानिमित्त येतात. मात्र, बाजारपेठ आणि अन्य ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक आणि कांदामार्केट येथील स्वच्छतागृहांची दुरवस्था  झाली आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे नसल्यामुळे त्यांची कुचंबणा होत आहे.  रेल्वे बसस्थानक, बसवेश्‍वर चौक (गोवावेस), सरकारी मध्यवर्ती ग्रंथालय, न्यायालय आवार, धर्मवीर संभाजी चौक ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. मात्र, या ठिकाणी शुल्क आकारले जात आहे. महिलांनी याकडे पाठच फिरवली आहे.