Fri, Apr 26, 2019 15:44होमपेज › Belgaon › डेंग्यू रोखण्यासाठी ग्रामपंचायतींना ‘डोस’

डेंग्यू रोखण्यासाठी ग्रामपंचायतींना ‘डोस’

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 06 2017 10:41PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतींना सूचनांचा डोस देण्यात आला आहे.  डेंग्यू रोखण्यासाठी ग्रा. पं. चा सहभाग वाढविण्यात येणार आहे. यासाठी पंचायत आणि ग्रामविकास खात्याने पुढाकार घेतला असून ग्रामपंचायतच्या माध्यमातून डेंग्यू निर्मूलनासाठी  जागृती मोहीम राबविण्याबरोबरच खबरदारी घेण्याचे आदेश बजावले आहेत. कृती आराखडा तयार करण्यास सूचविले आहे.
जिल्ह्यात डेंग्यू रुग्णांच्या संख्येेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आरोग्य यंत्रणा हबकून गेली आहे.

डेंग्यूला आळा घालण्यासाठी पंचायतराज आणि ग्रामविकास खाते सतर्क बनले आहे. त्यांनी सर्व ग्रा. पं. ना आदेश देऊन खबरदारी घेण्याचे बजावले आहेत. यासाठी जि. पं. ने पुढाकार घेतला असून महसूल खात्याच्या सहकार्यातून कृती आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. ग्रा. पं. कार्यक्षेत्रात सांडपाण्याची व्यवस्था, पाणी पुरवठा योजना, गटारीचे नियोजन, डास निर्मूलनाचे प्रयत्न यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.

आजवर केवळ आरोग्य खात्याकडून रोगावर आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. पहिल्यांदाच ग्रा. पं. च्या माध्यमातून लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित केली आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याचे ग्रा. पं. ना  बंधनकारक केले आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते. यामुळे पाणी साठवून ठेवण्यात येते. त्यातून डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो. कूपनलिका व विहिरीसभोवती पाणी साचू नये, यासाठीदेखील खबरदारी घेण्यात येईल. ग्रा. पं. सदस्य, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या यांचा डेंग्यू निर्मूलन मोहिमेसाठी उपयोग करण्यात येणार आहे. जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत सदस्यांना रोगाबाबत माहिती देण्यात येणार आहे. रोगाची लक्षणे आणि घ्यावयाची खबरदारी याबाबत जागृती करण्यात येणार 
आहे.