Thu, Nov 22, 2018 17:08होमपेज › Belgaon › गुळगुळीत रस्त्याची खोदाई; काम पाडले बंद

गुळगुळीत रस्त्याची खोदाई; काम पाडले बंद

Published On: Dec 24 2017 1:43AM | Last Updated: Dec 23 2017 11:08PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

शहर उपनगरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून काही ठिकाणी गुळगुळीत रस्त्यांची नव्याने सुधारणा होत आहे. असाच प्रकार चव्हाट गल्ली परिसरात शनिवारी घडला. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी चांगल्या रस्त्यावर पेव्हर बसविण्याचे काम बंद पाडले. चव्हाट गल्ली येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौकातून कोर्ट कंपाऊंडकडे जाणार्‍या रस्त्यावर जेसीबीने खोदण्याचे काम सुरू झाले. 4 इंचीच्या चांगल्या रस्त्यावर सुरू झालेल्या खोदकामामुळे नागरिक अचंबित झाले.

त्याचबरोबर खोदाईकामादरम्यान काही घरांच्या नळ आणि ड्रेनेजलाईनला धक्का बसला. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. यावेळी काही नागरिकांनी ठेकेदाराला रस्ताखोदाईसंदर्भात जाब विचारला. त्यावेळी स्थानिक नगरसेवक पुंडलिक परिट यांनी सदर रस्त्यावर पेव्हर बसविण्यासाठी 14 व्या वित्त आयोगातून निधी मंजूर करून घेतला आहे. मंजूर झालेल्या निधीतून पेव्हर बसविण्यात येणार आहे. पेव्हर बसविण्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात येत असल्याचे सांगितले. 

यावेळी नागरिकांनी रस्ता खोदाईवर आक्षेप व्यक्त केला. नजीकच्या कोर्ट कंपाऊंड आवारातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्या ठिकाणच्या रस्त्यांची सुधारणा करण्याऐवजी चांगले रस्ते का खोदले जात आहेत, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला.नागरिकांनी खोदाई कामाला विरोध दर्शविला. त्यामुळे चव्हाट गल्लीत काहीवेळ गोंधळ माजला. नागरिकांचा आक्षेप पाहून ठेकेदाराने खोदाई काम बंद केले. यासंदर्भात नगरसेवक पुंडलिक परिट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याबरोबर  संपर्क साधता आला नाही.