Tue, Jul 16, 2019 22:27होमपेज › Belgaon › अपघातामध्ये तीन युवक ठार

अपघातामध्ये तीन युवक ठार

Published On: Dec 12 2017 2:03AM | Last Updated: Dec 11 2017 11:49PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

ढाब्यावर जेवणासाठी निघालेल्या तीन मित्रांवर काळाने घाला घातला. हिंडाल्कोनजीक महामार्गावर थांबलेल्या आयशर वाहनाला दुचाकीने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात या  तिघांचा करूण अंत झाला. ही दुर्घटना रविवारी रात्री 12 च्या सुमारास घडली. बाळकृष्ण ऊर्फ प्रसाद मारुती पिंगट (वय 24, रा. भातकांडे गल्ली), विनायक रघुनाथ जाधव (वय 25, रा. बापट गल्ली) हे दोघे जागीच ठार झाले. तर, प्रतीक सुभाष जाधव (वय 20, रा. बापट गल्ली) याचा केएलई रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी मृत्यू झाला. 

काकतीनजीकच्या रविवारी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आटोपून पाच मित्र दोन दुचाकीवरून बेळगावहून काकतीकडे महामार्गावरून जात होते.  ढाब्याच्या अलीकडे काही अंतरावर आयशर मालवाहू वाहन महामार्गावर थांबले होते; मात्र अंधारात अंदाज न आल्याने तिघे मित्र बसलेल्या दुचाकीची आयशरला धडक बसली. ती इतकी जोरदार होती की दोघे जण जागीच ठार झाले, तर प्रतीकचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. तिघांच्याही डोक्याला जबर मार बसला होता. 

घटनेची माहिती उत्तर रहदारी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह जिल्हा शवागाराकडे पाठविण्यात आले. तर  जखमी प्रतीकला केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच सोमवारी दुपारी प्रतीकचाही मृत्यू झाला. शवचिकित्सेनंतर  तिन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.  अंत्यसंस्कार वेगवेगळ्या वेळी जागीच ठार झालेल्या  विनायकवर बापट गल्लीवासीयांनी दुपारी अंत्यसंस्कार केले. त्यानंतर काही वेळाने प्रतीकचाही मृत्यू झाल्याने त्याच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. काही अंतराने दोघांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ बापट गल्लीवासीयांवर  आली. 

अपघातामुळे भातकांडे व बापट गल्ली परिसरात शोककळा पसरली होती. मृत विनायक हा जनरेटर दुरुस्तीचे काम करीत होता. बाळकृष्ण हा उद्यमबाग येथे कारखान्यात कामाला जात होता. प्रतीकच्या पश्‍चात आई, विवाहित बहीण असा परिवार आहे. तर विनायकच्या पश्‍चात आई, लहान भाऊ असा परिवार आहे. बाळकृष्णच्या पश्‍चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. प्रतीक व बाळकृष्ण हे  कुटुंबीयांचे एकुलते चिरंजीव होते.  आयशर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.