Fri, Jul 19, 2019 00:52होमपेज › Belgaon › चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात टीकेची झोड

चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात टीकेची झोड

Published On: Jan 22 2018 1:25AM | Last Updated: Jan 22 2018 1:46AMबेळगाव  : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात महत्त्वाचे पद आणि कोल्हापूरचे पालकत्व मिळाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडून बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांच्या आशा उंचाविल्या होत्या. त्यातच अनेक वर्षानंतर महाराष्ट्र सरकारने बेळगाव सीमाप्रश्‍नी चंद्रकांत पाटील यांची सीमासमन्वयक मंत्रिपदी नियुक्ती केल्यानंतर सीमावासियांमधून आनंद व्यक्त करण्यात आला होता. गेल्या तीन वर्षांच्या काळात चंद्रकांत पाटील यांनी सीमावासियांच्या सार्‍या अपेक्षा फोल ठरविल्या. त्यातच गोकाक येथील वादग्रस्त विधानातून त्यांनी सीमावासियांचा रोष ओढावून घेतला आहे. सीमावासियांतून त्यांच्या विरोधात टीकेची झोड उटली आहे. 

उचगाव मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि सातारा येथील यशवंतराव चव्हाण  इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या त्या विधानावर कडाडून टीका करताना चंद्रकांत पाटील हे संधीसाधू माणूस आहेत. त्यांना मराठी माणसाबद्दल कळकळ नाही. कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. कर्नाटकात आपले सरकार यावे, यासाठी त्यांनी कन्नडिगांशी आपुलकी राखण्याचे काम केले आहे. त्यांनी आजपयंर्ंत सीमावासियांच्या बाजूने काही केलेले नाही. बेळगाव सीमावासियांनी त्यांच्याकडून कोणत्याच अपेक्षा बाळगू नयेत. चंद्रकांत पाटील यांनी सीमाप्रश्‍न कन्नडिगांना विकून टाकला आहे, अशी खरमरीत टीका करताना डॉ. कुंभार यांनी पाटील यांच्या विधानाचा निषेध केला आहे. 

येथील मराठी भाषिक युवा मंचच्यावतीने चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना मंत्रिपदावरू त्वरित हटविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य मराठी अस्मितेविरोधातील आहे. चंद्रकांत पाटील यांनी सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. चंद्रकांत पाटील यांना सीमाप्रश्‍नाचे गांभीर्य कळालेले नाही. त्यांचे मराठी प्रेम ‘करनाटकी’ आहे. भाजपचे सीमावासियांविषयीचे प्रेम बेगडी आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.   सीमाप्रश्‍नाचे गांभीर्य नसलेल्या आणि मराठी भाषिकांना डिवचणार्‍या चंद्रकांत पाटील यांची सीमा समन्वयक पदावरून हकालपट्टी करण्यात यावी. त्यांच्या जागी सीमाप्रश्‍नाची जाण असलेल्या योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी मराठी युवामंचच्यावतीने करण्यात आली आहे. 

सोशल मीडियावर निषेध

चंद्रकांत पाटील यांच्या  वादग्रस्त आणि सीमावासियांच्या जखमांवर मीठ चोळणार्‍या वक्तव्याचा सोशल मीडियावरही खरपूस समाचार घेण्यात आला. अनेकांनी चंद्रकांत पाटील हे कन्नडधार्जिणे आहेत. त्यांना विधानसभा निवडणुकीत या भागात आपल्या पक्षाचे काम करायचे आहे. त्यांना मराठी जनतेच्या हिताचे देणे घेणे नाही, अशा व्यक्तीला सीमाभागात निवडणुकीच्यावेळी धडा शिकविला जाईल, अशाप्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या.