Tue, Jul 23, 2019 17:11होमपेज › Belgaon › आमच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची

आमच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 10:49PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

सोमवारी रात्री खडक गल्ली परिसरात दंगल झाली. त्यानंतर पोलिसांनी धरपकडसत्र आणि घरोघरी जाऊन झडती घेतली. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रविवारी खडक गल्लीत  झालेल्या बैठकीत महिलांनी पोलिस उपायुक्त सीमा लाटकर यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. पोलिस समाजकंटकांचा बंदोबस्त करत नाहीत. आमच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची, असा सवालही संतप्त महिलांनी केला. रविवारी खा. सुरेश अंगडी, अ‍ॅड. अनिल बेनके, किरण जाधव यांनी खडक गल्लीतील नागरिकांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या बैठकीवेळी सीमा लाटकर, अमरनाथ रेड्डी उपस्थित होते. पोलिसांनी गल्लीतील युवकांना अटक केली आहे. नंतर घराघरांची झडती घेतली. ज्या घरात दगड, विटा मिळाल्या, त्यांना नोटीस बजावली आहे. 

त्यामुळे नागरिकांत असंतोष पसरला आहे. या असंतोषाचे पडसाद रविवारच्या बैठकीत उमटले. या परिसरात वारंवार तणाव निर्माण होत आहे. पोलिसांना  समाजकंटकांच्या कारवाया रोखता आलेल्या नाहीत. युवकांना घराबाहेर रहावे लागत आहे. समाजकंटकांच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. पोलिस खात्याने समाजकंटकांचा वेळीच बीमोड केला असता तर नागरिकांना दिलासा मिळाला असता. नागरिकांनाच सजग राहावे लागत आहे, असे महिलांनी सांगितले. लाटकर म्हणाल्या, संवेदनशील भागात 5 लाख खर्चून कॅमेरे व अन्य यंत्रणा बसविली आहे. नागरिकांनीही पोलिसांना तपासासाठी सहकार्य करावे. खा. सुरेश अंगडी, अनिल बेनके, किरण जाधव यांनीही महिलांच्या तक्रारी ऐकल्या. आ. संजय पाटील व माजी आ. अभय पाटीलही उपस्थित होते.