बेळगाव : प्रतिनिधी
बनावट डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत दुर्लक्षावरून तालुका आरोग्याधिकारी व गर्भवती महिलांच्या नातेवाईकांकडून पैशाची मागणी करण्याच्या प्रतापामुळे आशा कार्यकर्त्यांना मंगळवारी पार पडलेल्या विकास आढावा बैठकीत टार्गेट करण्यात आले. तालुका पंचायतच्या महात्मा गांधी सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ता.पं.अध्यक्ष शंकरगौडा पाटील होते. नियोजित वेळेपेक्षा ता.पं.अध्यक्ष व कार्यकारी अधिकारी ए.एस.हलसुडे यांनी दोन तास उशिरा उपस्थिती दोन तास उशीरा उपस्थिती लावल्याने अन्य उपस्थितांत नाराजी व्यक्त करण्यात आली. व्यासपीठावर ता.पं. उपाध्यक्ष मारूती सनदी, कार्यकारी अधिकारी ए.एस.हालसोडे होते.
तालुक्यात दिवसेंदिवस बनावट डॉक्टरांची संख्या वाढत आहे. रूग्णांच्या जिवाशी खेळ केला जात आहे. तालुका आरोग्याधिकारी म्हणून काय कारवाई केली. असा आरोप करून उपस्थित पदाधिकार्यांनी डॉ.संजीव नांद्रे यांना चांगलेच धारेवर धरले. यावर डॉ.नांद्रे यांनी आगामी काळात कारवाई गतीमान करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांचे मार्गदर्शन घेऊन असे उत्तर दिले. यानंतर तालुक्यातील काही अंगणवाडी, आशा कार्यकर्त्यांच्या वरकमाईबाबत चर्चा झाली. कामात हयगय दाखविणार्या आशा कार्यकर्त्या चक्क गर्भवती महिलांच्या नातेवाईकांना नको तो सल्ला देऊन विनाकारण पैशाची मागणी करत असल्याचा आरोप पदाधिकार्यांनी केला.
तालुक्यात विशेष घटक योजना आणि गिरीजन विशेष योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, असे आदेश देऊन कार्यकारी अधिकारी ए.एस.हालसोडे म्हणाले, योजनेत भ्रष्टाचार करणार्यांना थारा देणार नसून कडक कारवाई करू.उपाध्यक्ष मारूती सनदी यांनी समाज आणि बालकल्याण खात्याच्या अधिकार्यांना अंगणवाडी इमारतीच्या प्रश्नावरून धारेवर धरले. यानंतर अनेक ग्रा.पं.मध्ये आशा कार्यकर्त्यांच्या जागा जाणून-भुजून रिक्त ठेवल्याचे कारण काय, असा सवाल शंकरगौडा पाटील यांनी केला.
यावर उपस्थित अधिकार्यांनी सदरचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून मंजुरी मिळाल्यास कार्यवाही तातडीने पूर्ण करू.डॉ. नांद्रे यांनी टीबीबाबत जनजागृती सुरू असून टी.बी.रूग्णांचे सर्वेक्षण लवकरच पूर्ण होईल असेही सांगितले. वनखात्यामार्फत रस्त्याशेजारी वृक्ष लागवड करण्याचा केवळ फार्सच सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणूकीची आचार संहिता केंव्हाही लागण्याची शक्यता असल्याने विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश शंकरगौडा पाटील यांनी प्रशासनाला दिले.