Fri, Jul 19, 2019 00:51होमपेज › Belgaon › 60 कोटी खर्चूनही किणये धरण अर्धवट 

60 कोटी खर्चूनही किणये धरण अर्धवट 

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 06 2018 9:20PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरू पाहणार्‍या किणये धरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. सुमारे 60 कोटी 48 लाख रु. खर्चूनही काम अर्धवट असून केवळ 60 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. किणये परिसर सह्याद्रीच्या  व्याप्तीत येतो. जांबोटी परिसरापर्यंत पसरलेल्या घनदाट जंगलामुळे या भागात मुसळधार पाऊस होतो. मात्र या भागात कोणतेही मोठे धरण अथवा नदी नसल्याने पाणी वाया जाते. याचा फायदा शेतीला होत नाही. कोसळणार्‍या पावसाचा सदुपयोग करण्यासाठी किणये परिसरात धरण उभारणीचे काम सुरू आहे. यात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्यामुळे सुमारे बारा वर्षापासून सुरू असणारे धरणाचे काम अर्धवटच आहे.

या धरणाची संकल्पना 2003-04 च्या दरम्यान मांडण्यात आली. त्यानुसार या ठिकाणी सर्वेक्षण करून आराखडा तयार करण्यात आला. प्रशासनाने आराखड्याला 2006 मध्ये मंजुरी दिली. त्यानंतर कामाला सुरवात झाली. अद्याप सदर कामकाज सुरूच आहे. या धरणात साठणार्‍या पाण्यावर 2 हजार 965 एकर क्षेत्रातील जमीन ओलिताखाली येणार आहे. याचा लाभ परिसरातील शेतकर्‍यांना होणार आहे. 2003-04 मध्ये या प्रकल्पासाठी 9.31 कोटी अंदाजित खर्च होता. यानंतर यामध्ये वाढ झाली. यासाठी 79 कोटीचा  प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

आतापर्यंत यासाठी 60.48 कोटी खर्चण्यात आले आहेत. किणये, रणकुंडये, बहाद्दरवाडी परिसरातील शेतकर्‍यांना योजनेचा लाभ होणार आहे. या परिसरात सध्या भात, रताळी, बटाटा, भुईमूग, ऊस आदी पिके घेण्यात येतात. पाण्याअभावी बागायती पिके घेणे अशक्य आहे. धरण पूर्ण झाल्यास या भागातील जमीन अधिक प्रमाणात ओलिताखाली येणार असून यातून शेतकर्‍यांना आर्थिक आधार मिळणार आहे.
ही योजना पूर्ण झाल्यास याचा लाभ शेतीबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. खानापूर तालुका नजीक असल्याने यातील काही गावांनाही याचा फायदा होणार आहे. यामुळे हा प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
 

 

 

tags : Belgaum,news, taluka, Kiranay,dam, work, 60,per cent, works,