Tue, May 21, 2019 04:21होमपेज › Belgaon › मुलाच्या आत्महत्येनंतर आई आणि बहिणीची आत्महत्या

मुलाच्या आत्महत्येनंतर आई आणि बहिणीची आत्महत्या

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 10:58PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

शनिवारी सकाळी टिळकवाडी येथील रेल्वे रुळावर एकाने आत्महत्या केली होती. त्याची आज ओळख पटली. तो मृतदेह माळी गल्ली येथील संतोेष शामसुंदर नावगावकर याचा होता. त्याची आई रुक्मिणी नावगावकर (वय 60, रा. माळी गल्ली), बहीण सरिता गणेश बुलबुले (वय 30, रा. गणेशपूर) या दोघींनी त्या मृतदेहाची रविवारी सकाळी ओळख पटविली आणि त्यानंतर दुःख अनावर झाल्याने रुक्मिणी व सरिता या दोघी माय-लेकींनी सायंकाळी गांधीनगरनजीकच्या रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 

संतोेष याने शनिवारी रेल्वेखाली झोकून आत्महत्या केली होती. त्याची शनिवारी रात्रीपर्यंत ओळख पटली नव्हती. रविवारी सकाळी वर्तमानपत्रातील वृत्तानंतर संतोषची आई रुक्मिणी व बहीण सरिता यांनी शवागार गाठले आणि संतोषची ओळख पटवली. संतोषचा मृतदेह पाहून रुक्मिणी व सरिता यांना दुःख अनावर झाले. त्यावेळी त्यांची परिस्थिती पाहून त्यांच्यावर वैद्यकीय  उपचार करण्यात आले. सरीताचे पती गणेश यांनी दोघींनाही माळी गल्ली येथील घरी पोहचविले. त्यानंतर ते संतोषच्या मृतदेहाच्या पुढील सोपस्कारासाठी शवागाराकडे गेले. 

संतोषच्या आत्महत्येने व्यतिथ झालेल्या रुक्मिणी आणि सरीता यांनी दुपारी 3 वा. सर्वप्रथम  धारवाड रोड बंद असलेल्या फाटका गाठले. त्या दोघीही तेथील रुळावर बराच वेळ बसल्याचे पाहून कांहींनी त्या दोघींनाही लवकरच गाडी येत असल्याची कल्पना देत त्यांना तेथून निघून जाण्याचे सांगितले. नागरिक आपणाला तेथून निघून जाण्यास सांगत असल्याचे पाहून त्या दोघीही तेथून पुढे गांधीनगरकडे निघाल्या. चार वाजण्याच्या सुमारास त्या दोघींनीही राष्ट्रीय महामार्गाजवळील रेल्वे पुलाजवळील रेल्वे मार्गावर धावत्या गाडीखाली स्वतःला झोकून दिले. यामध्ये दोहीघी जागीच ठार झाल्या. 

दोघींच्या आत्महत्येची माहिती गांधीनगर परिसरात वार्‍यासारखी पसरली. ती दुर्दैवी घटना पाहण्यासाठी गर्दी झाली. कांहींनी माळमारुती पोलिसांना माहिती कळविली. माळमारुती पोलिस माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले. त्यांनी रेल्वे पोलिसांना रेल्वे रुळावरील आत्महत्येची माहिती कळविली. रेल्वे पोलिस घटनास्थळी आले. बर्‍याच उशिरापर्यंत त्या दोघींची ओळख पटत नव्हती. मात्र रेल्वे पोलिसांनी सकाळी दोघींनाही पाहिले होते. त्यामुळे घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती सरीताचे पती गणेश यांना कळविण्यात आली.

सायंकाळी उशिरापर्यंत संतोष  पाठोपाठ रुक्मिणी आणि सरीताच्या आत्महत्येचा पंचनामा सुरु होता. दरम्यान संतोष याच्या भावानेही काही वर्षांपूर्वी राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यानंतर शनिवारी संतोषने तर रविवारी त्याची आई आणि बहिणीने केलेल्या आत्महत्येनंतर माळी गल्ली परिसरात उडाली. आत्महत्या प्रकरणी सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती.