Fri, May 24, 2019 02:49होमपेज › Belgaon › उसाचे ट्रॅक्टर बनताहेत ‘यमदूत’

उसाचे ट्रॅक्टर बनताहेत ‘यमदूत’

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 10:17PM

बुकमार्क करा

बेळगाव : शिवाजी शिंदे

सध्या ऊस तोडणी हंगाम जोमात असून रस्त्यावर ऊस वाहून नेणार्‍या ट्रॅक्टरांची वर्दळ वाढली आहे. सदोष पद्धतीने सुरू असणारी ऊस वाहतूक रस्त्यावरून धावणार्‍या अन्य वाहन चालकांच्या जीवावर उठली आहे. याप्रकारच्या सदोष वाहतुकीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भुतरामट्टी घाटात गुरुवारी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि आराम बसचा अपघात झाला. यामध्ये एकजण ठार झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले. याचप्रकारची घटना पुणे बंगळूर महामार्गावरील होनगानजीक महिन्यापूर्वी घडली होती. यामध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मी दर्शनाला निघालेल्या हावेरी जिल्ह्यातील सावनूर येथील दोन भाविकांना जीव गमवावा लागला होता. यातून ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यावर प्रत्येकवर्षी अपघाताच्या घटनामध्ये वाढ होते. मागील वर्षीच्या गाळप हंगामातील केवळ तीन महिन्याच्या अपघातात 12 जणांना जीव गमवावा लागला होता. यातून या प्रश्‍नाचे गांभीर्य समोर येते. साखर  कारखाना प्रशासनाकडून ऊस वाहतुकीसाठी प्रामुख्याने ट्रॅक्टरना प्राधान्य देण्यात येते.  त्याचबरोबर ट्रॅक्टर मालकाकडून कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून ऊस वाहतुकीला प्राधान्य देण्यात येते. परंतु सदर वाहतूक करताना पुरेशी खबरदारी घेण्यात येत नाही. यामुळे वारंवार दुर्घटना  घडताना दिसतात. 

ऊसाच्या वाहतुकीनुसार ट्रॅक्टर मालकाला कारखान्याकडून भाडे अदा करण्यात येते. यामुळे ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरच्या क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरतात. यासाठी सर्रास दोन ट्रॉलींचा वापर करण्यात येतो.एका ट्रॉलीची क्षमता 14 ते 15 टन इतकी असते. परंतु, यामध्ये 18 ते 20 टन भरण्यात येतो. नफा कमाविण्यासाठी बेकायदेशीरपणे अधिक ऊस भरला जातो. हे प्रकार जीवघेणे ठरत आहेत. तसेच सर्रास विनापासिंग ट्रॉलींचा वापर करण्यात येतो. ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरांच्या अपघातास प्रामुख्याने ट्रॉली कारणीभूत ठरतात. ट्रॅक्टरला स्वतंत्रपणे ट्रॉली जोडण्यात येते. यामुळे त्यांना इंडिकेटर नसतो. त्याचबरोबर रिफ्लेक्टरदेखील वापरण्यात येत नाही. केवळ एका लाईटच्या जोरावर ट्रॅक्टरचालक बेफामपणे ट्रॅक्टर दामटत असतात. त्यातून अपघात घडून अनेकांचे  बळी जातात. त्यामुळे याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.