Wed, Jul 08, 2020 04:42होमपेज › Belgaon › दंगलखोरांवरील कारवाईत हस्तक्षेप नाही

दंगलखोरांवरील कारवाईत हस्तक्षेप नाही

Published On: Dec 28 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 1:34AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

खडक गल्ली, भडकल गल्ली व परिसरातील भागामध्ये वारंवार  जातीय दंगली करणार्‍यावर कठोर कारवाई करण्याचा आदेश पोलिस अधिकार्‍यांना बजावला असून, ही कारवाई करताना कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही, अशी ग्वाही बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली आहे. दंगलखोरावर कारवाई करताना जात, धर्म बाजूला ठेवून कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे, असेही  जारकीहोळी यांनी सांगितले. खडक गल्ली, परिसरात  घराघरांची, वाहनांची दगडफेक करून व जाळपोळ करून नुकसान केले जात आहे. सर्व काही घडून गेल्यानंतर घटनास्थळी पोलिस हजर होतात, असे पत्रकारांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून देताच ते म्हणाले, दंगलीची पाळेमुळे खोदून काढण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला आहे. यापुढे जातीय दंगल होणार नाही याची खबरदारी घेण्यासही पोलिस खात्याला बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दंगलीसंदर्भात जिल्हा प्रशासनाची सरकारी विश्रामधामात आढावा बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दंगलग्रस्त भागात ठिकठिकाणी दिवे जातील व मूव्हिंग सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील, असे पालकमंत्र्यांनी सांगताच पत्रकारांनी त्यांना सांगितले की, दंगलीच्या वेळी ते कॅमेरे बंद पाडले जातात. त्यामुळे पोलिस घरामध्ये असलेल्या तरुणांना अटक करून घेऊन जातात. त्याबद्दलही यापुढे पोलिस खात्याला दक्ष राहण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आ. फिरोज सेठही उपस्थित होते. त्यांच्यावर पत्रकारांनी प्रश्‍नांची सरबत्ती केली. तुमच्या हस्तक्षेपामुळे दंगलखोर माजले असल्याचा व पोलिस अधिकार्‍यांच्या कामकाजात तुमचा थेट हस्तक्षेप असल्यामुळे  पोलिस अधिकार्‍यांना मुक्तपणे कारवाई करता येत नाही, असे सांगितले. त्यावर आ. सेठ  संतप्त बनले. ते म्हणाले  माझा मतदारसंघ असल्याने कोणतीही अनुचित घटना घडली तर तेथे जावे लागते. ज्या 17 तरुणांबद्दल मी पोलिसांना सांगत होतो की, ते निरपराध आहेत, त्यांना मी गेल्या काही वर्षांपासून ओळखतो.