Tue, Aug 20, 2019 05:18होमपेज › Belgaon › दोन मंदिरांवर चोरट्यांचा डल्ला

दोन मंदिरांवर चोरट्यांचा डल्ला

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 11:27PM

बुकमार्क करा

बेळगाव  : प्रतिनिधी

शहर परिसरात वाटमार्‍यांना ऊत आला असताना चोरट्यांनी ग्रामीण मंदिरांना लक्ष्य केले आहे. शनिवारी रात्री बेळवट्टी येथील लक्ष्मी मंदिर व खानापूर तालुक्यातील मोरब येथील कलमेश्‍वर मंदिरातील लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.  आठ दिवसांपूर्वी समादेवी गल्लीतील गौड सारस्वत ब्राह्मण समाजाच्या हरी मंदिरातील चांदीचे पूजा साहित्य चोरट्यांनी चोरले. शनिवारी रात्री बेळवट्टी लक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍याचा दरवाजा तोडून प्रवेश केला. मंदिरातील सोन्याचे 3 गंठन, 10 ग्रॅम वजनाची कर्णफुले, 5 घंटा, अर्धा तोळ्याची नथ, चांदीचा कमरपट्टा, दोन छल्ले व मूर्तीवरील आभूषणे, इतर चांदीचे पूजेचे साहित्य असा एकूण तीन लाखांचा ऐवज लंपास केला. 

रविवार सकाळी ही घटना उघडकीस आली. नेहमीप्रमाणे मंदिरात देवदर्शनासाठी आलेल्या गावकर्‍यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. ग्रामीण पोलिसांना याची माहिती देण्यात आली. ग्रामीण ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जाधव यांनी जाऊन पंचनामा केला. यानंतर श्‍वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. जांबोटी : मोरब येथील कलमेश्‍वर मंदिरातील दोन घंटा, तीन समया आणि देणगीपेटीतील काही रक्कम मिळून पंधरा हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. ही घटना रविवारी सकाळी गावकर्‍यांच्या निदर्शनास आली. दोन्हीही मंदिरांत चोरी झाल्याने परिसरात खळबळ माजली. याची माहिती मिळताच  जांबोटी आऊटपोस्टचे पोलिस अर्जुन जोत्यान्नावर यांनी पंचनामा केला. बेळवट्टी ता. पं. सदस्य नारायण नलवडे, बैलूर पंचायत सदस्य शांताराम सदावरकर, सातेरी कणबरकर व देवस्थान कमिटीचे सदस्य, गावकरी उपस्थित  होते.