होमपेज › Belgaon › स्मार्ट वीजवाहिन्यांसाठी  २३ कोटी फी आकारणार

स्मार्ट वीजवाहिन्यांसाठी  २३ कोटी फी आकारणार

Published On: Dec 30 2017 12:33AM | Last Updated: Dec 30 2017 12:32AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी   

हेस्कॉमने बेळगाव शहरामध्ये   घातलेल्या भूमिगत वीजवाहिन्यांसाठी   23 कोटी रुपयांचे शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच हे शुल्क अदा झाल्याशिवाय पुढचे काम होऊ न देण्याचाही निर्णय झाला. तथापि, भूमिगत वीजवाहिन्या हा स्मार्ट सिटी प्रकल्पाचाच भाग असल्याने आणि स्मार्ट सिटीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिकेचीच असल्याने आता ते काम आता महापालिकाच रोखणार  का, असा प्रश्‍न आहे.

हेस्कॉमने भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम 90 टक्क्यांपर्यंत पूर्ण केले आहे. एकूण 380 कोटींच्या या योजनेद्वारे शहरामध्ये एकूण 980 कि.मी. भूमिगत वीजवाहिन्या घातल्या जातील. पैकी 695 कि.मी.वाहिनी घालण्यात आली आहे. उर्वरित 285 कि.मी. वाहिनी घालण्याआधी प्रथम हेस्कॉमकडून शुल्क वसूल केल्यानंतरच पुढील कामकाज करू द्यावे, असा निर्णय शुक्रवारी मनपाच्या सर्वसाधारण बैठकीत झाला.

अध्यक्षस्थानी महापौर संज्योत बांदेकर या होत्या. आयुक्त शशिधर कुरेर म्हणाले, भूमिगत वाहिनी घातल्याबद्दल हेस्कॉमकडून प्रति मीटरला 185 रु. दराने रक्कम  (रो चार्जेस) वसूल करण्यात येणार असून, या रकमेपोटी मनपाला 23 कोटी रु.चा महसूल मिळेल.

या विषयावर सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांनी भूमिगत वाहिनी मनपाच्या परवानगीशिवाय घालायला दिलीच कशी, असा प्रश्‍न विचारून मनपा अभियंत्यांना धारेवर धरले. त्यावर  निवेदन करताना आयुक्त कुरेर म्हणाले, हुबळी व बेळगावसाठी राज्य सरकारने भूमिगत विद्युत केबल  योजना मंजूर केली. ही योजना सरकारचीच असल्याने पुन्हा त्यासाठी मनपाकडून परवानगी घेण्याचे आवश्यकता नसल्याचे सांगितले.