होमपेज › Belgaon › स्मार्ट सिटीमधील प्रकल्पाला महापालिकेचाच खोडा

स्मार्ट सिटीमधील प्रकल्पाला महापालिकेचाच खोडा

Published On: Dec 31 2017 1:30AM | Last Updated: Dec 31 2017 12:45AM

बुकमार्क करा
बेळगाव ः शशी बेळगुंदकर

स्मार्ट सिटी प्रकल्पातील भूमिगत वीजवाहिन्यांचे काम रोखण्याचा प्रयत्न महापालिकेने चालवला असल्याचे सर्वसाधारण बैठकीत स्पष्ट झाले. स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिकेवरच आहे, पण आता महापालिकाच त्यातील वीजवाहिनी प्रकल्प रोखणार आहे. हेस्कॉमने 23 कोटी रुपये शुल्क भरल्याशिवाय पुढचे काम होऊ द्यायचे नाही, असा ठरावच महापालिकेने शुक्रवारी केला!

कर्नाटक सरकारने बेळगाव शहरासाठी 380 कोटी रुपये खर्चाची भूमिगत वीजवाहिन्या योजना मंजूर करून हेस्कॉमकडून अंमलबजावणी करण्याचे कामही मागील दोन वर्षापासून हाती घेतले आहे. या योजनेंतर्गत बेळगाव शहरामध्ये एकूण 980 कि. मी. लांबीच्या केबल्स घालण्यात येणार आहेत. आतापर्यंत 615 कि. मी. भूमिगत केबल घालण्याचे काम हेस्कॉमने कंत्राटदाराकडून पूर्ण करून घेतले आहे. आता केवळ 285 कि. मी. केबल घालण्याचे काम शिल्लक राहिलेले आहे. 

तथापि, बेळगाव स्मार्ट सिटी योजनेच्यादृष्टीने भूमिगत विद्युत केबल योजना महत्त्वकांक्षी असली तरी सदर योजना नियोजनबध्दरित्या व तांत्रिक बाबींचा विचार न करता राबविली असल्याने ही योजना बेळगाव मनपाला भविष्यात धोकादायक ठरेल, असा नगरसेवकांचा आक्षेप आहे. 

वाहिन्या घालताना हेस्कॉमने कोणत्याही तांत्रिक बाबींचा विचार केलेला दिसून येत नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे.  रस्त्याच्या बाजूने यंत्राद्वारे खोदाई करून वाहिन्या घालण्याचे काम सुरु आहे. मात्र, काही ठिकाणी वीजवाहिनी जलवाहिन्या व भुयारी गटारींवर घालण्यात आल्याचा नगरसेवकांचा दावा आहे. 

बेळगाव शहरातील रस्त्यांच्या दोहोबाजूने एकतर जलवाहिन्या, भुयारी गटारी, तसेच मोेबाईल कंपन्यांच्या केबल्स आहेत त्यामध्ये बीएसएनएलचाही समावेश आहे. भूमिगत वीजवाहिनी घालताना या बाबींचा तज्ज्ञ अभियंत्यांकडून आराखडा तयार करून ही वीजवाहिनी जलवाहिन्या किंवा भुयारी गटारींच्या नेमकी वर नसेल हे पाहिले पाहिजेत होते. या मुख्य तांत्रिक बाबींचा ना मनपा अभियंत्यांनी ना हेस्कॉमच्या अभियंत्यांनी विचार केल्याचे दिसून येते. त्यालाच नगरसेवकांनी आक्षेप घेतला. 

बेळगाव शहर, वडगाव, अनगोळ, शहापूर, एस.पी.एम. रोड, खडेबाजारात  जलवाहिन्या उद्ध्वस्त झाल्याचे प्रकार घडले. त्यामुळे काही भागात सांडपाणीमिश्रीत पाणीपुरवठा झाला. या तक्रारी आल्यानंतरही हेस्कॉम व मनपा अधिकार्‍यांनी भूमिगत वाहिन्या घालण्याच्या कामात सुधारणा केली नाही. त्यामुळे नगरसेवकांनी महापालिका अभियंत्यांनाही धारेवर धरले पाहिजे. पण, महापालिकेने सारी जबाबदारी हेस्कॉमवर ढकलून स्वतःचीच स्मार्ट सिटी योजना अडथळयंच्या शर्यतीत ढकलली आहे. 

मनपाचे कोणतेही काम दर्जेदार व पुढील काही वर्षांचा विचार करून केलेले नसल्याने जलवाहिन्या, भुयारी गटारी किंवा चेंबर्सची दुरुस्ती ही करावीच लागणार आहे.  त्यामुळे किमान यापुढे तरी वीजवाहिन्यांचे काम व्यवस्थित झाले पाहिजे. पण त्यासाठी महापालिका जागी होणार का? स्वतःचा स्मार्ट सिटी प्रकल्प आपणच अडचणीत आणत आहोत, हे महापालिकेला उमगणार का?