Thu, Jul 18, 2019 02:22होमपेज › Belgaon › शिवचित्ररथ मिरवणूक पारंपरिक मार्गानेच

शिवचित्ररथ मिरवणूक पारंपरिक मार्गानेच

Published On: May 19 2018 1:30AM | Last Updated: May 19 2018 12:25AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगावचे वैभव असलेली शिवजयंती चित्ररथ मिरवणूक पारंपरिक मार्गानेच निघणार आहे. तसा निर्णय शुक्रवारी झाला. सायंकाळी 6 वाजता नरगुंदकर भावे चौकातून मिरवणुकीला प्रारंभ होईल. पोलिस प्रशासनानेही मिरवणुकीला परवानगी दिली. मात्र, डॉल्बी लावल्यास जप्त करण्याचा इशारा दिला आहे.

मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहाय्य करावे. प्रदूषणविरहित मिरवणूक करण्यासाठी फटाके व डॉल्बीचा वापर करू नये. तसे झाल्यास कारवाईचा इशारा पोलिस आयुक्त एम. चंद्रशेखर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.

शनिवारी संध्याकाळी 6 ते रविवार सकाळी 8 वाजेपर्यंत मिरवणूक असेल, अशी माहिती मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळानी दिलेली आहे. देखावे सादर करताना व फलकावर मजकूर लिहिताना कुणाच्या भावना दुखू नयेत, याची खबरदारी मंडळानी घ्यावी. कमीत कमी वेळेत प्रसंग सादर करुन मिरवणूक लवकर संपविण्यावर भर द्यावा. मार्गावर फटाके फोडू नयेत, डॉल्बी वापरू नये.
*वाहतुकीत बदल

मिरवणूक काळात शनिवारी रात्री दोनपर्यंत वाहतुकीत बदल पुढीलप्रमाणे करण्यात आला आहे.चन्नमा सर्कलपासून खानापूरकडे जाण्यासाठी कॉलेज रोड बंद राहील. चन्नमा सर्कलमधील गणेश मंदिराकडून सिव्हिल हॉस्पिटलमार्गे कॅम्पमधून ग्लोब थिएटरजवळून वाहने नेता येतील. जिजामाता सर्कलकडून देशपांडे पेट्रोल पंप, नरगुंदकर भावे चौक, पाटील गल्लीमार्गे फोर्टरोड नव्या उड्डाण पुलावरुन वाहने हाकता येतील. मिरवणूक मार्गावर चित्ररथ वगळता इतर  दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी आहे.

डॉल्बी जप्तीचा इशारा

मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याचा त्रास रुग्ण व लहान मुलांना होतो. यासाठी डॉल्बी वापरण्यास बंदी घातली आहे. याचे उल्लंघन केल्यास डॉल्बीसह वाहन जप्तीचा इशारा आयुक्तांनी दिला. यावर्षीही शिवजयंती मिरवणुकीचे आयोजन आज शनिवारी केले आहे. दुसर्‍या दिवशी वडगाव भागात मिरवणूक आहे. शहर परिसरात मिरवणूक सुरळीत पार पडण्यासाठी  तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.