Sun, May 19, 2019 13:59
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › गोवावेस चौकाला सिग्नलची प्रतीक्षा

गोवावेस चौकाला सिग्नलची प्रतीक्षा

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 10:13PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

गोवावेस बसवेश्‍वर चौकात सिग्नल यंत्रणा नसल्याने याठिकाणी नेहमी वाहतुकीला अडथळे येत आहेत. यासाठी वारंवार मागणी करूनही वाहतूक पोलिस विभागाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. यापूर्वी सिग्नलअभावी अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. यामुळे अजून जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्‍न शहरवासीयांतून विचारला जात आहे.  शहराला वाहतूक कोंडीची  फार मोठी समस्या भेडसावत आहे. शहरात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सिग्नल व्यवस्था असणे गरजेचे आहे. यामध्ये गोवावेस येथील बसवेश्‍वर चौक, आरपीडी, तिसरा रेल्वे गेट व  शहापूरातील तुकाराम बँक सर्कल जवळ सध्य स्थितीत सिग्नलची फार मोठी आवश्यकता आहे. खानापूर रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे गोवावेस चौकात येणारी एका बाजूची वाहतूक सध्या बंद आहे. मात्र, खानापूर रोड,

 शहापूर व पहिल्या रेल्वे गेटकडून येणारी वाहतूक सुरु असल्याने या ठिकाणी गर्दी होते. यामुळे या ठिकाणी सिग्नल व्यवस्था गरजेची आहे. आरपीडी परिसरात अनेक महाविद्यालये आहेत. यामुळे या चौकात सतत विद्यार्थ्यांची ये-जा असते. तसेच वाहनांचीही वर्दळ असते. यासाठी या ठिकाणी सिग्नल व्यवस्था सुरु केल्यानंतर वाहतुकीवरील भार कमी होण्यासाठी मदत होईल. रेल्वे ओव्हरब्रिज बंद असल्यामुळे काँग्रेस रोडवरील वाहतुकीचा भार वाढला आहे. तसेच यामुळे तिसर्‍या रेल्वेगेटवर ताण पडत आहे. वाहतुकीला अडथळा येऊ नये यासाठी या ठिकाणी पाच पोलिस तैनात केले आहेत. येथे सिग्नल व्यवस्था बसविल्यानंतर वाहतुकीला शिस्त लागेल तसेच रहदारी पोलिसही जास्त लागणार नाहीत. शहापुरातील तुकाराम बँकेजवळ देखील सिग्नल गरजेचा आहे. कपिलेश्‍वर मंदिरजवळील रेल्वे उड्डाणपुलावरून वाहने याठिकाणी येऊन थांबतात. यासाठी येथे सिग्नल व्यवस्था आवश्यक आहे.