होमपेज › Belgaon › शिवसृष्टी खुली, समस्या जैसे थे

शिवसृष्टी खुली, समस्या जैसे थे

Published On: Jan 22 2018 1:26AM | Last Updated: Jan 21 2018 9:08PMबेळगाव : प्रतिनिधी      

महापौर संज्योत बांदेकर व अन्य नगरसेवकांनी शनिवारी शिवाजी उद्यानातील शिवसृष्टीला भेट दिली होती. रविवारपासून शिवसृष्टी सर्वांसाठी खुली करण्यात येत असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात शिवसृष्टीतील काही कामे अद्यापही बाकी आहेत. रविवारी पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत शिवसृष्टीचे द्वार बंदच असल्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला. या शिवसृष्टीबाबत चार वर्षांपासून सातत्याने चर्चा होत आहे. गतवर्षी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शिवसृष्टीतील कामे नव्याने हाती घेण्यात आली होती.

यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसृष्टीचे उद्घाटन झाले होते. शिवसृष्टी सर्वांना लवकरच खुली करण्यात येणार असल्याचे पाच महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. 
शनिवारी महापौर बांदेकर यांनी शिवसृष्टीला भेट दिली. तेथील कामकाजाची माहिती मनपा अभियंते नरसन्नावर यांच्याकडून घेतली. ‘बुडा’कडून शिवसृष्टीच्या कामात विलंब झाल्यामुळे महापालिकेने यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला होता. मनपा सभागृहात शिवसृष्टीतील उर्वरित कामाबाबतही जोरदार चर्चा झाली होती. तरीही अद्याप शिवसृष्टीतील कामे जैसे थे असल्याचे महापौर संज्योत बांदेकर यांच्या निदर्शनास आले. 

शिवसृष्टीतील ध्वनी आणि प्रकाश यंत्रणेचे काम पुणे येथील संस्थेला देण्यात आले आहे. संस्थेच्या सदस्यांनी शिवसृष्टीची पाहणी केली. शिवसृष्टीतील ध्वनी आणि प्रकाश योजनेच्या कामाबाबतची माहिती  बुडाला देण्यात आली. शिवसृष्टीतील दिवे बंद आहेत. शिवचरित्रावर आधारित शिल्पांची माहिती देण्यासाठी कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. फरशा काही ठिकाणी उखडल्या आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर उभे असलेले दोन भव्य हत्ती कोलमडण्याचीही शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर रविवारपासून शिवसृष्टी खुली करण्यात येत असल्याच्या वृत्ताने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. 

रविवारी सकाळपासून काही नागरिकांनी सुट्टीच्या दिवशी शिवसृष्टीला भेट दिली. पण मुख्य द्वार बंद होते. शिवसृष्टी केव्हा उघडणार याची माहितीही नागरिकांना मिळू शकली नाही. माहिती मिळाल्यानंतर दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने शिवसृष्टीला भेट देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवसृष्टीत नेमलेल्या सुरक्षा रक्षकाने शिवसृष्टी आजपासून खुली होत असल्याचे माहीत नाही. येथे अद्यापही अनेक कामे बाकी आहेत, असे सांगून शिवसृष्टीच्या कामकाजावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. यामुळे महापौर बांदेकर यांनी शिवसृष्टीसंदर्भात ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत शिवप्रेमी व्यक्त करीत आहेत.