Tue, May 21, 2019 18:27होमपेज › Belgaon › मतदार याद्यांमध्ये गंभीर चुका

मतदार याद्यांमध्ये गंभीर चुका

Published On: Jan 29 2018 1:44AM | Last Updated: Jan 28 2018 8:31PMबेळगाव : प्रतिनिधी

मतदार याद्यातील गंभीर चुकांमुळे अनेकाना आपला मतदानाचा पवित्र हक्क गमवावा लागतो तर अनेक मतदारांची नावे याद्यामध्ये दोन-दोन ठिकाणी समाविष्ट असल्यामुळे त्याना छुप्या पध्दतीने दोनदा मतदान करण्याचा हक्क मिळतो. याचा गंभीर परिणाम निवडणुकीच्या निकालावर होतो. निवडणुकीमध्ये खर्‍या अर्थाने  लोकेच्छा प्रकट होत नाही. 
याचा लाभ निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा वाटणार्‍या, किमती वस्तू घरपोच करणार्‍या उमेदवाराला मिळतो. तो नियम धाब्यावर, कायदा पायदळी तुडविणारा उमेदवार विजयी होतो. निवडणुकीमधील हा गंभीर प्रकार दूर करण्यासाठी निवडणूक यंत्रणेने व मतदार नोेंदणी अधिकारी, कर्मचार्‍यांनी आपले काम करताना, मतदार याद्यांची पुनर्रचना करताना नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे.

तरच ग्रा. पं. पासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुका पारदर्शक पार पडतील.  बेळगाव जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्यापूर्वी बेळगाव मतदारसंघामध्ये 18000 पेक्षा जास्त बोगस मतदारांची नावे यादीत नमूद होती. त्या मतावर म. ए. समितीचा त्याग करून काँग्रेसची उमेदवारी मिळविलेले रमेश कुडची विजयी झाले होते. केवळ निवडणुकीच्या दोन-तीन दिवसापूर्वी बोगस मतदारांचे प्रकरण पत्रकार व एका जागृत कार्यकर्त्याच्या साहाय्याने बाहेर आले होते. परंतु तत्कालीन मतदार नोंदणी अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकार्‍यानी बोगस मतदार व ती यादी तयार केलेले अधिकारी, कर्मचार्‍यावर कारवाई केली नाही. परिणामी समितीचा विजयी अश्वमेध बोगस मतदारांमुळे रोखला गेला. 

त्यावेळी माळमारुती, सदाशिवनगर, हनुमाननगर भागामधील एकेका खुल्या प्लॉटच्या पत्त्यावर इतकेच नव्हे तर मनपाच्या खुल्या जागांवरसुध्दा बेळगावबाहेरील येथे रोजंदारीचे काम करण्यासाठी आलेल्यांची नावे 250 ते 500 पर्यंत नोंदविण्यात आली होती. यानंतर या प्रकरणी समितीने व अ‍ॅड. माधव चव्हाण यांनी बोगस मतदार नोंदणीची चौकशी करून मतदार नोंदणी अधिकार्‍यावर व कर्मचार्‍यावर कारवाईची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. आयोगाने बोगस मतदारांची नावे याद्यामधून काढून टाकण्याचा आदेश बजावला. मतदार नोंदणी अधिकार्‍यावर कारवाई केलीच नाही. सध्यासुध्दा बेळगाव उत्तर मतदारसंघातील मतदारांची नावे बेळगाव ग्रामीणमध्ये तर 
बेळगाव दक्षिणमधील काहींची नावे ग्रामीणमध्ये समाविष्ट झाल्याची शक्यता आहे. 

याद्यातून मतदारांची नावे गायब करण्याचे प्रकारही घडतात. ज्यावेळी याद्या अवलोकनासाठी ठेवल्या जातात, त्यावेळी मतदारांनी नावे तपासून पाहण्याची गरज आहे. गोकाक व अरभावी विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यामध्येही गोंधळ असल्याची तक्रार भाजपचे नेते अशोक पुजारी व इतरानी करून जिल्हाधिकार्‍यांनी या दोन्ही संघातील  याद्यांची पडताळणी करावी, अशी  मागणी केली आहे. 


गोकाक व अरभावी विधानसभा मतदार संघाच्या डमतदार याद्यामधून जागृत मतदारांची नावे गाळण्यात आली आहेत. याची चौकशी झाली पाहिजे.
- अ‍ॅड. एस. बी. खानगौडर  प्रमुख संघटक भारतीय जागृत मतदार मंच घटप्रभा