Mon, May 20, 2019 20:07होमपेज › Belgaon › बेळगावचा संवेदनशील भाग कर्जासाठी ब्लॅकलिस्टमध्ये

बेळगावचा संवेदनशील भाग कर्जासाठी ब्लॅकलिस्टमध्ये

Published On: Jul 20 2018 1:10AM | Last Updated: Jul 20 2018 1:10AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगावातील संवेदनशील भागात राहणार्‍या नागरिकांना फायनान्स कंपन्यांनी  ब्लॅकलिस्टमध्ये घातल्याची माहिती मिळाली आहे. बेळगावात एका मोठ्या फायनान्स कंपनीने संवेदनशील भागातील गल्ल्यांची व उपनगराची नोंद करुन ती  नाने सॉफ्टवेअरमध्येत ब्लॅक लिस्टमध्ये घातली आहेत. त्यामुळे त्या परिसरातील रहिवाशी कर्ज मागण्यासाठी आला तर त्याचे नाव कंपनीचे सॉफ्टवेअर स्वीकारतच नाही!

बेळगावातील एक नामवंत कंपनी  शून्य टक्के दराने इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी मदत करते. संवेदनशील भागात राहणार्‍या एका युवकाला स्मार्ट फोन घ्यावयाचा होता. त्याने संबंधित शोरुमध्ये संपर्क साधला. आधारकार्ड फोटो घेऊन या तुम्हाला सुलभ हप्याने शून्य टक्के दराने वस्तू विकत मिळते, अशी माहिती देण्यात आली. त्यानुसार युवकाने आधारकार्ड घेऊन शोरुमला संपर्क साधला.

आधारकार्डवरील पत्ता पाहून फायनान्स एजंटने तुम्ही याच पत्त्यावर राहता का, असे दोनदा विचारुन खातरजमा करुन घेतली. त्यानंतर तो म्हणाला, ‘सॉरी तुम्हाला आम्ही अर्थसाह्य करू शकत नाही.’युवकाने कारण विचारले असता, तुुम्ही हवे तर दुसर्‍याच्या नावे मोबाईल घ्या. मात्र या पत्यावर फायनान्स कंपनी अर्थसाह्य देण्यास तयार नाही, अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर त्या युवकाने आपल्या मित्राला आधारकार्डसह शोरुममध्ये बोलावून घेतले. त्याच्या आधारकार्डवरचा पत्ताही संवेदनशील भागाचाच होता. त्यामुळे त्या युवकालाही अर्थसाह्य नाकारण्यात आले. त्याने कारण विचारले असता विशिष्ट गल्ल्या आणि नगरे कंपनीच्या ब्लॅकलिस्टमध्ये असल्याची माहिती देण्यात आली. 

दोन्ही युवकांनी एजंटला विश्‍वासात घेऊन विचारता बेळगावातील संवेदनशील भागाचा समावेश ब्लॅकलिस्टमध्ये केला असून त्याप्रमाणे कंपनीचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. माझ्या मनात तुम्हाला मदत करायची असली तरी, सॉफ्टवेअर तुमचे अर्जच स्वीकारत नाही, त्यामुळे माझा नाईलाज आहे अशी माहिती एजंटाने दिली.  

संवेदनशील भाग कोणता?

‘पुढारी’ला मिळालेल्या माहितीनुसार खडक गल्ली, चव्हाट गल्ली, जालगार गल्ली, दरबार गल्ली, घी गल्ली, चांदू गल्ली, शिवाजी नगर, गांधीनगर हा भाग संवेदनशील असून तो कंपनीच्या काळ्या यादीत टाकण्यात आला आहे.  या भागातील युवकांना अर्थसाह्य केले तरी वसुलीची खात्री नाही, गुंडगिरीचा धोका, तंटे वाढण्याचा धोका अशी कारणे कंपन्यांनी पुढे केली आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी  पुढाकार घेऊन ब्लॅकलिस्टमधून ही नावे वगळण्यासाठी प्रयत्न करणार का, हा प्रश्न आहे.