होमपेज › Belgaon › दारूचा कहर, अबकारी ‘बेखबर’!

दारूचा कहर, अबकारी ‘बेखबर’!

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 03 2017 8:15PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यात विविध गावांतून दारूबंदीचे धुमारे निघू लागले आहेत. मात्र सरकारमान्य अरॅक दारूची दुकाने बंद झाल्यानंतर ग्रामीण भागात गावठीचा जोर वाढला आहे. अबकारी खात्याची कारवाई निमित्तमात्र मानली जात आहे. यातूनच गावठी दारू गाळणारे दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. शनिवारी काकतीजवळील जंगलात झालेल्या अबकारी पोलिसांच्या कारवाईतून ग्रामीण भागातील गावठी दारूचा अंमल पुन्हा दिसला आहे.

काकती, कणबर्गीजवळील घनदाट जंगलातील वस्त्या,  ओढे व पाणथळ ठिकाणी कित्येक वर्षांपासून काळ्या गुळापासून गावठी दारू तयार करण्यात येत आहे. सरकारने अरॅकवर बंदी आणल्यानंतर तळीरामांना विदेशी दारू दुकानाशिवाय पर्यायच राहिला नाही. विदेशीची झिंग सर्वसामान्य तळीरामांना परवडणारी नाही. यामुळे शहर व ग्रामीण तळीरामांना गावठीचे वेध लागलेले असतात. 
अरॅक बंद केल्यानंतर शासनाने एमएसआयएल माध्यमातून सरकारमान्य दारू विक्री सुरू केली.शहरात अशा दुकानांतून स्वस्त दारू विक्री होत आहे. ग्रामीण भागात एमएसआयएल दारू दुकानांची संख्या कमीच आहे. यामुळे शहरातून एमएसआयएल दुकानातून दारू नेऊन ती गावागावात विक्री केली जात आहे. 

एमएसआयएल दुकानातून   मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात  अवैधरीत्या दारू विक्री केली जात असताना अबकारीने अर्थपूर्ण डोळा केल्याची चर्चा आहे. अनेक गावांतून गावठी व बनावट विदेशी दारू कमी दरात उपलब्ध होऊ लागल्याने मद्यपींचा उच्छाद वाढला असताना गावठी विक्रेत्यांची चंगळ आहे. काकती, होनगा, मुत्यानट्टी, कणबर्गी, यमनापूर, भुतरामहट्टी भागात कित्येक वर्षांपासून खुलेआम गावठी दारूची  विक्री होत आहे.  दारूसाठी शेजारच्या गावाबरोबरच शहरातील तळीरामांची हजेरी असते. गावठी विक्रीला नेत्यांचा वरदहस्त लाभल्याची चर्चा असते.ग्रामीण भागात होणार्‍या गावठी दारूसंदर्भात स्थानिक पोलिसांना माहिती देतात. पोलिस गावठी विक्रीकडे दुर्लक्ष करतात. अबकारी खात्याच्या कार्यक्षमतेवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेे.

गावठीविरोधात कोणी तक्रार करण्यास पुढे आल्यास धमकी देण्याचे प्रकार घडतात. काकती जंगलभागात शनिवारी पहाटे गेलेल्या अबकारी पथकावर कारवाई दरम्यान दगडफेक झाली.असे प्रकार  पूर्वीही घडले आहेत. एका युवकाच्या मृत्यू प्रकरणी त्या भागातील काहींनी अबकारी कार्यालयावरच चाल केली. अबकारी वाहने व कार्यालयावर दगडफेक झाली. दोन कर्मचारी जखमी झाले. ल्लेखोरांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल झाली. मात्र हा सारा खेळ केवळ निमित्तमात्र मानला जात आहे. गांधीनगर, महाव्दार रोड, कामत गल्ली, कपिलेश्‍वर रेल्वे लाईन, टिळकवाडीत गावठी विक्री बंद झाली आहे. गँगवाडीत गावठीची चलती आहे. येथे अनेकवेळा गावठी विरोधात कारवाईची नाटके झाली.काही वेळा हाणामार्‍याही झाल्या आहेत.