Thu, Apr 25, 2019 16:04होमपेज › Belgaon › शाळकरी मुलीचे अपहरण

शाळकरी मुलीचे अपहरण

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 07 2017 12:19AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

अनगोळ येथील गाडगीळ बसस्टॉप. सकाळी 9.30 ची वेळ. बसस्टॉपवर काही मोजक्या प्रवाशांसह एक शाळकरी मुलगीही उभी आहे. याठिकाणी दुचाकी स्वार येतो. फिल्मीस्टाईलने त्या मुलीला गाडीवर बसण्यासाठी गळ घालतो. मुलगी नकार देते. त्यानंतर त्या शाळकरी मुलीला जबरदस्तीने दुचाकीवरून अपहरण करून नेतो. बसस्टॉपवर एकच खळबळ उडते. पोलिसांना माहिती मिळते आणि दोन तासातच पोलिस अपहरण झालेल्या मुलीचा छडा लावतात. आरोपीला गजाआड करतात. हा सारा प्रकार बुधवारी घडला आहे.

बुधवारी सकाळी शाळकरी मुलीचे दुचाकीवरून आलेल्या कुरबर गल्ली येथील कुतुबुद्दीन सुतार (वय 21) याने अपहरण केले. त्यामुळे अनगोळ परिसरात खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती मिळताच टिळकवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मौनेश देेशनूर घटनास्थळी आले. याचबरोबर तत्काळ अपहरण झालेल्या शाळकरी मुलीच्या शोधाची चक्रे फिरविली.  मिळालेल्या माहितीच्या आधारे मौनेश देशनूर व त्यांच्या सहकार्‍यांनी तत्काळ कुतुबुद्दीला ताब्यात घेतले. त्या शाळकरी मुलीची सुटका केली. आणि मुलीला पालकांच्या ताब्यात दिले.त्याचबरोबर कुतुबुद्दीनवर अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी केली. बेळगावचे पोलिस विविध कारणांनी टिकेचे लक्ष बनले असताना टिळकवाडी पोलिसांनी अपहरणाचा दोन तासात छडा लावला.  याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.