Sat, Apr 20, 2019 15:51होमपेज › Belgaon › अनगोळ येथील शाळेचा पाणीपुरवठा बंद

अनगोळ येथील शाळेचा पाणीपुरवठा बंद

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 11:27PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी  

सरकारच्यावतीने विविध योजनांतर्गत विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा दिल्या जातात. मात्र, अनगोळ येथील सरकारी शाळेतील 300 विद्यार्थ्यांना गेल्या 8 दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्याचे बिल अदा न केल्यामुळे शाळेचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पाण्यासाठी नगरसेवक विनायक गुंजटकर यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना पत्र पाठवावे लागले आहे. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके दिली जातात. माध्यान्ह आहारही देण्यात येतो.सरकारी शाळांना स्वच्छतागृहे बांधून देण्यात आली आहेत. सरकारी शाळांना वार्षिक खर्चापोटी सरकारकडून 30 हजार रुपये अनुदान मिळत असते. मिळालेल्या वार्षिक अनुदानातून शाळा मुख्याध्यापकांना शाळेचा संपूर्ण खर्च चालवावा लागतो. यामध्ये पिण्याच्या पाण्याचे बिल, वीज बिल, स्वच्छतागृह सफाईसाठी खर्च करावा लागतो.

अनगोळ येथील सरकारी कन्नड माध्यमाच्या  शाळेत  1 ली ते 8 वी पर्यंतचे 300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सरकारकडून मिळणार्‍या अनुदानातून खर्च करणे शाळा मुख्याध्यापकांना परवडेनासे झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून मुख्याध्यापकांनी पाण्याचे दीड वर्षांपासूनचे 46 हजार रुपये बिल अदा केलेले नाही. सरकारकडून वर्षाला 30 हजार रुपये अनुदान मिळते. मात्र, पाण्याचे बिल 46 हजारांवर गेल्याने मुख्याध्यापकांची तारांबळ उडाली आहे. पाणीपुरवठा विभागाने शाळा मुख्याध्यापकांना वारंवार बिल अदा करण्याचे कळविले होते. मात्र, शाळेने बिल अदा न केल्याने 8 दिवसांपूर्वी शाळेचा पाणीपुरवठा तोडण्यात आला असून विद्यार्थ्यांना गेल्या 8 दिवसांपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी मनपा प्रशासकीय बैठकीत शाळेचे पाण्याचे बिल माफ करण्यात यावे, अशी विनंती आयुक्‍तांकडे केली होती. ‘मनपा’ आयुक्‍तांनी सरकारी शाळा व्यवस्थेची जबाबदारी जिल्हा पंचायतीवर असल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची जबाबदारी झटकली. त्यामुळे गुंजटकर यांना शाळेच्या पाणीपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याबरोबर जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांना पत्र पाठविण्याची वेळ आली आहे.