होमपेज › Belgaon › शवागारचे होणार स्थलांतर

शवागारचे होणार स्थलांतर

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 8:57PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांत शवागरात येणार्‍या मृतदेहांची संख्या वाढली आहे. त्याबरोबरच शवागरात मूलभूत  सुविधांचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळेच जिल्हा रुग्णालय परिसरातील शवागर नव्या जागेत उभारण्यात येणार आहे. नवे शवागर पूर्णपणे वातानुकूलित असणार आहे. बेळगाव पोलिस आयुक्त व्याप्तीतील 14 पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागरात येत असतात. शवागरात विविध प्रकरणातील मृतदेहावर शवचिकित्सा केली जात असते. शवागरातील व्यवस्थेकडे आतापयंर्ंत कोणीही गंभीरपणे लक्ष दिलेले दिसत नाही. याठिकाणी सध्या दोन कर्मचारी आहेत. तीन कर्मचार्‍यांना  दिवसभरात येणार्‍या मृतदेहांवर शवचिकित्सा करावी लागते.

बेळगावच्या शवागरात महिन्याकाठी सरासरी 80 ते 90 मृतदेहांवर शवचिकित्सा केली जाते. वर्षभरात हजारोच्या आसपास ही संख्या जाते. याठिकाणी दोन डॉक्टर, एक पी. जी. व तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यापैकी शवागारात खर्‍या अर्थाने दोन कर्मचारीच कायम काम करताना दिसतात. वेळी अवेळी शवागरात मृतदेह आणले जातात. अनेकवेळा रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर विजेसाठी शवागराच्या शेजारील जागेत जनरेटर व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. शवागराच्या परिसरात पाण्याची टाकी आहे. टाकीतील पाणी नेहमीच अस्वच्छ दिसून येते. त्यामुळे शवागरात स्वच्छ पाण्याची व्यवस्था अत्यावश्यक आहे. शवागरात शवचिकित्सा केली जात असताना बाहेर येणार्‍या नागरिकांना  आसन व्यवस्था नाही. त्यामुळे अनेकवेळा ऊन-पावसात नागरिक शवागराबाहेर ताटकळत उभे असतात. 

शवागरातील  एका खोलीत सध्या 9 रकान्यांची शीतपेटी आहे. या शीतपेटीत मृतदेह ठेवले जातात. बेवारस, अज्ञात मृतदेह ठेवण्यासाठी शीतपेटीची गरज असते. मात्र बेळगावच्या शवागरातील शीतपेटीची उंची जादा आहे. उंचीच्या शीतपेटीतील वरील रकान्यात मृतदेह ठेवण्यासाठी योग्य त्या प्रकारच्या सुविधा नाहीत. शवागराच्या आसपासच्या परिसरात गवत वाढले आहे. गवतात अनेकवेळा सरपटणारे प्राणी पाहावयास मिळतात. शवागराचे बांधकाम करून 40 वर्षे लोटली असून गेल्या काही वर्षांत शवागराची रंगरंगोटीही झालेली नाही. त्यामुळे शवागराचेे नूतनीकरण होणे आवश्यक होते.