Sun, Nov 18, 2018 13:25होमपेज › Belgaon › बेळगावच्या तरुणाचा नृसिंहवाडीत बुडून मृत्यू 

बेळगावच्या तरुणाचा नृसिंहवाडीत बुडून मृत्यू 

Published On: Jun 01 2018 1:43AM | Last Updated: Jun 01 2018 12:12AMनृसिंहवाडी : प्रतिनिधी

नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथे दत्त दर्शनासाठी गेलेल्या बेळगाव येथील व्यंकट श्रीनंदन पट्टाराव (वय 18) या तरुणाचा गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाला. याबाबतची वर्दी वडील पी.श्रीहरी राव यांनी शिरोळ पोलिसात दिली आहे.

श्रीहरी राव हे पत्नी, मुलगा व  मुलाच्या  मित्रांसोबत  दत्त दर्शनासाठी नृसिंहवाडी येथे गेले होते. दर्शनापूर्वी त्यांचा मुलगा व्यंकट श्रीनंदन पट्टा हा होला गुंडी, प्रमित सौदी, साई  विष्णू व एम.प्रज्वल यांच्या समवेत संगमाजवळ घाटावर स्नानासाठी गेले होता. यातील व्यंकट श्रीनंद पट्टा हा अचानक बुडू लागल्याचे पाहून काही वेळाने मित्रांनी आरडाओरड केली. तेथूनच काही अंतरावर असलेल्या नावाडी संजय गावडे, काशीनाथ लोणार, अक्षय चव्हाण, शिवा सोनार, मजीद कणगी  यांनी शोधाशोध केली.  तासाभरानंतर व्यंकट श्रीनंद पट्टा यांचा मृतदेह पाण्यात   सापडला. या घटनेमुळे व्यंकटच्या आईनेनदीकाठी हंबरडा  फोडला. त्यांचा आक्रोश तर हृदय पिळवटून टाकणारा होता. काही क्षणातच आपला मित्र आपल्यातून निघून गेल्याने मित्र भांबावले होते.

बेळगाव येथील व्यंकट श्रीनंद पट्टा हा बेंगळूर येथे इंजिनिअरिंग कॉलेजच्या पहिल्या वर्षाला शिकत  होता. चार दिवसांपूर्वी शेवटचा पेपर देऊन तो  आईवडील व मित्रांसमवेत ट्रिपसाठी इकडे आला होता. त्याला एक मोठा भाऊ आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.