Sun, May 31, 2020 17:37होमपेज › Belgaon › तरीही ग्रामीण मतदारसंघामध्ये चुरसच

तरीही ग्रामीण मतदारसंघामध्ये चुरसच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : महेश पाटील    

बेळगाव ग्रामीण मतदारसंघ भाजपचे विद्यमान आ. संजय पाटील यांनी आपल्या वक्तृत्वाच्या आणि कामकाजाच्या कार्यशैलीवर एकहाती जिंकला. त्यांना ज्या व्यक्तीमुळे निवडणूक सोपी गेली, ते माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा बेळगाव ग्रामीण मतदारसंघ चर्चेत आला असून आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळविण्याबरोबरच निवडणुकीमध्येही चुरस निर्माण होणार आहे. 

महाराष्ट्र एकीकरण समितीमधून अद्यापही मनोहर किणेकर यांचे नाव आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चर्चेत आहे. मात्र, समितीमधून काही कार्यकर्त्यांचा कानोसा घेतला असता नवा चेहरा देण्यात यावा. काँग्रेसच्या उमेदवार म्हणून लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नाव घोषित करण्यात आल्याने महिला उमेदवार देण्यात यावा, असा प्रवाह सुरू झालेला आहे. काहीजण तर आता रस्ता मोकळा झाला आहे, असे सांगत आहेत. 

बेळगाव ग्रामीण मतदारसंघात कानोसा घेतल्यानंतर समितीमध्ये यापूर्वी जे दोन गट कार्यरत होते त्यांची मने दुभंगलेली होती. शिवाजी सुंठकर समितीमधून बाहेर गेले असले तरी अद्यापही त्यांचा गट त्यांच्या पाठिशी असल्याचे जाणवून येत आहे. सध्या त्यांच्या संपर्कात काही एपीएमसी सदस्य, जि. पं. सदस्य व नगरसेवक असल्याने सुंठकर यांना दुर्लक्षित करुन कोणालाही चालणार नाही. त्यांना मानणारा त्यांचा वर्ग आणि कार्यकर्ते आहेत. यापूर्वी वेगळ्या गटातील ज्यांची मने दुभंगलेली आहेत त्यांना समितीला एकत्रित करावे लागणार आहे. 

संघटना बळकट करण्यात वाक् बगार असलेले शिवाजी सुंठकर भाजपमध्ये गेल्य नंतर आता दुसर्‍या गटामध्ये असा आघाडीचा नेता राहिलेला नाही. समितीमधून महिला उमेदवार म्हणून विद्यमान जि. पं. सदस्या सरस्वती पाटीलही आघाडीवर आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी समिती आणि भाजपला तगडी लढत दिली आहे. त्यांनी बेळगाव ग्रामीण मतदार संघातील कन्नड भागासह मराठी भागामध्येही आपला दबदबा निर्माण केला आहे. पक्षश्रेष्ठींनी ग्रामीण मतदार संघात लक्ष्मी हेब्बाळकर या उमेदवार असल्याचे जाहीर केले आहे. या मतदारसंघातील पारंपरिक काँग्रेसच्या मतांबरोबरच प्रमुख कार्यकर्त्यांची मते मिळविण्यासाठी त्यांनी आघाडी उघडली  . 
भाजपचे विद्यमान आमदार संजय पाटील यांनी सलग दोनवेळा ग्रामीण मतदार संघातून विजयश्री प्राप्त केली आहे.

त्यांच्या या विजयात सलग दोनवेळा हिरेबागेवाडी विभागातून मताधिक्य मिळाले आहे. यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आ. संजय पाटील यांना  कामांसाठी निधी देताना टोलवाटोलवी करण्यात आली आणि तसा आरोप ते सातत्याने करत आहेत. नुकताच झालेल्या भाजप परिवर्तन यात्रेमध्ये त्यांनी शक्तीप्रदर्शन केले आहे. 
एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बेळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे.