Tue, May 21, 2019 12:39होमपेज › Belgaon › ६३ वी अखिल भारतीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा बेळगावात

६३ वी अखिल भारतीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा बेळगावात

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 10:27PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने ‘सीबीएसई’ शिक्षण संस्था व शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबच्या संयुक्त विद्यमाने 63 व्या अखिल भारतीय शालेय स्केटिंग स्पर्धांचे आयोजन 10 ते 13 डिसेंबरदरम्यान शिवगंगा रिंगवर करण्यात आले आहे.  गेली दोन वर्षे शिवगंगा स्केटिंग रिंगवर ही स्पर्धा भरविण्यात येत आहे. स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन खेळाडूंना देण्यात येणार्‍या सर्व सुविधा, या निकषावर ‘एसजीएफआय’ सलग तिसर्‍यांदा 63 वी रोलर स्केटिंग स्पर्धा भरविण्याचा मान बेळगावच्या शिवगंगा क्लबला देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची हा भारतातील एकमेव स्केटिंग रिंग असून जवळपास 2000 (दोन हजार) खेळाडूंची सोयही केली जाते.

या राष्ट्रीय शालेय स्केटिंग स्पर्धेत देशाच्या 30 राज्यांतील सुमारे 1500 खेळाडू भाग घेणार आहेत. यात प्रामुख्याने यजमान कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, आयसीसी पब्लिक स्कूल, मोरारजी देसाई, विद्याभारती, केंद्रीय विद्यालय, राजस्थान छत्तीसगड, बिहार, तमिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणाचे खेळाडू सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धा रविवार दि. 10 डिसेंबर 2017 पासून सुरु होणार आहेत.

11,14,17 व 19 वर्षांखालील मुला मुलींच्या गटात स्कॉड व इनलाईन स्केटिंग प्रकारात स्पर्धा होणार आहेत. तसेच मुलांच्या गटात रोलर हॉकी स्पर्धाही होणार आहे. स्पर्धेची जय्यत तयारी स्पर्धेसाठी शिवगंगा स्केटिंग  रिंग सुसज्ज बनविण्यात आली असून मुख्य शामियाना, पालक व खेळाडूंना बसण्यासाठी पेंडॉल, मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची व जेवणाची व्यवस्था व विविध राज्यातील खेळाडूंना सरावासाठी रिंगही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी शिवगंगा क्लबच्या अध्यक्षा ज्योती चिंडक  15 दिवसांपासून परिश्रम घेत आहेत.