Fri, Apr 26, 2019 15:40होमपेज › Belgaon › सीमाप्रश्‍नी महापालिकेत ठराव संमत करा

सीमाप्रश्‍नी महापालिकेत ठराव संमत करा

Published On: Feb 05 2018 1:59AM | Last Updated: Feb 05 2018 12:01AMबेळगाव : प्रतिनिधी

सीमाप्रश्‍न हा सीमाभागातील 25 लाख मराठी भाषिकांच्या अस्मितेचा प्रश्‍न आहे. हा प्रश्‍न न्यायालयात महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे. महापालिकेत मराठी अस्मिता प्रकट करण्यासाठी येत्या बैठकीत सीमाप्रश्‍नाचा ठराव संमत करावा, असा महत्त्वपूर्ण ठराव म. ए. समिती युवा कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. मराठा मंदिर येथे रविवारी मराठी भाषिकांच्या एकीसाठी सीमाभागातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपरोक्‍त ठराव टाळ्यांच्या गजरात संमत केला. मदन बामणे यांनी ठराव मांडला. ते म्हणाले, बेळगावची मनपा सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांची अस्मिता आहे. तेथे मराठी भाषिकांचे वर्चस्व आहे.

सीमाप्रश्‍न न्यायालयात असल्यामुळे मनपामध्ये सीमाप्रश्‍नाचा ठराव संमत होणे अत्यावश्यक आहे. मराठी नगरसेवकांनी ठराव बैठकीत मांडून संमत करावा. सूरज कणबरकर म्हणाले, संयुक्‍त महाराष्ट्राची चळवळ सुरू असताना मुंबई महापालिकेमध्ये संयुक्‍त महाराष्ट्राचा ठराव बहुमताने पारित करण्यात आला होता. यामुळे मुंबई महाराष्ट्राला देणे भाग पडले. याचप्रमाणे मराठी नगरसेवकांनी सीमाप्रश्‍नाचा ठराव पारित केल्यास त्याचा फायदा न्यायालयीन कामकाजाकरिता होईल. मराठी भाषकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रशासनाने महापौरपदासाठी आरक्षण ठेवले आहे. बहुमत असूनदेखील मराठी नगरसेवकांना महापौरपदापासून लांब राहावे लागणार आहे.

अशा मतलबी प्रशासनाला ठरावातून सणसणीत चपराक हाणावी. श्रीकांत मांडेकर म्हणाले, एकेकाळी बेळगावमध्ये येण्यास कर्नाटकाचे मंत्री घाबरत होते. परंतु, अलीकडे हे चित्र बदलले आहे. महापौर पालकमंत्र्यासोबत कार्यक्रमाला हजेरी लावतात, हे दुर्दैव आहे. नगरसेवकांनी दबावाला बळी न पडता  सीमाप्रश्‍नाचा ठराव  मांडावा. नगरसेवक विनायक गुंजटकर, राजू बिर्जे, कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते. श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले. म. ए. समिती एकीबाबतही चर्चा करण्यात आली.