Mon, Mar 25, 2019 13:35होमपेज › Belgaon › ध्येयवेडा तरुण चालवतोय ‘वाचनकट्टा

ध्येयवेडा तरुण चालवतोय ‘वाचनकट्टा

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 03 2018 9:22PM

बुकमार्क करा
’बेळगाव : संदीप तारीहाळकर  

मणगुत्ती (ता. हुक्केरी) येथील हरहुन्नरी, वाचनवेडा तरूण युवराज सतबा कदम याची वाचन संस्कृती रुजविण्यासाठी अन विस्तारासाठी सुरू असलेली धडपड लक्षवेधी आहे. 2012 साली कोल्हापूर येथे  विनामोबदला सुरू  केलेला उपक्रम पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, सातार्‍यात पोहचला आहे. या उपक्रमाचे कौतुक महाराष्ट्रभर होत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या आवारात ज्येष्ठ साहित्यिक प्रा.चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते या वाचनकट्ट्याला प्रारंभ करण्यात आला. या माध्यमातून शेकडो शाळा, महाविद्यायातील वाचन चळवळीसाठी जागर सुरू आहे. शिवाजी विद्यापीठ आवारातील वाचनकट्टट्याचा परिघ आता सीमाभागासह  चंदगडपर्यंत विस्तारू  लागला आहे. आतापर्यंत सांगली, सातार्‍यासह इतर ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

‘दादांची पुस्तक बॅग’ या उपक्रमांतर्गत अनेक शाळांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. अशा एकूण 5 बॅग असून प्रत्येक बॅगमध्ये शंभरहून अधिक पुस्तके आहेत. ही बॅग पंधरवड्यापर्यंत एकाच शाळेत ठेवली जाते. दरम्यानच्या काळात थोर चरित्रावर संवाद तसेच मनोरंजनात्मक कथांवर चर्चा केली जाते. सामाजिक भान जपत तरुणाई सर्जनशिलता व्हावी, आत्मविश्वास निर्माण व्हावा याबरोबरच भाषासंवर्धनही व्हावे, हा उद्देश ठेवून सुरू केलेल्या या उपक्रमाला प्रा.चंद्रकुमार नलगे, डॉ. सुनीलकुमार  लव्हटे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ.विनोद कांबळे, प्रा. अनुराधा गुरव, कृष्णात खोत, राजन गवस, डॉ. बी. एम. हिर्डेकर, सोनाली नवांगुळ, सुप्रिया वकील, नीलांबरी कुलकर्णी, हेमा गंगातीरकर, गोविंद गोडबोले हे मान्यवर लेखक, कादंबरीकार विनामोबदला वाचनकट्ट्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून वाचकांशी संवाद साधत आहेत. 

यंदा 12 जानेवारी ते 15 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत वाचन चळवळीसाठी  दुर्गम भागातील 5 शाळा दत्तक घेतल्या आहेत. या शाळांत काव्यमैफल, एका पुस्तकावर मत?मतांतरे घेतली जातात. पंधरवड्यातून एकदा लेखक वा कवींची थेट भेट घडविली जाते. या उपक्रमाचा लाभ आजपर्यंत किमान 15 हजार विद्यार्थ्यांना झाला आहे. यातून अनेक विद्यार्थी  वाचन संस्कारीत झाल्याने त्यांच्यातील आत्मविश्वास वृध्दिंगत झाला आहे.  युवराज कदम यांचे दहावीपर्यंतचे  शिक्षण मणगुत्ती येथेच झाले. हलाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करत  हॉटेलमधून काम करून उच्च शिक्षण पूर्ण केले. या प्रवासात कोल्हापूरस्थित कै. मंगल चंद्रकांत कागिणकर यांची प्रेरणा लाभली आहे. बालपणी स्वत:च्या घरी काही महिने बहीण, वडिलांबरोबर ग्रंथवाचन होत असे. त्यातूनच युवराज याने हा संकल्प तडीस नेला आहे.