Thu, Mar 21, 2019 23:22
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › टिळकवाडी रेल्वे फाटकावर अपघाती सापळा

टिळकवाडी रेल्वे फाटकावर अपघाती सापळा

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 03 2018 9:28PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी      

रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे टिळकवाडी परिसरातील तीनही रेल्वे फाटकांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. यातच पहिल्या रेल्वे फाटकादरम्यान खचलेल्या पेव्हर रस्त्यामुळे पादचारी आणि वाहनधारक जखमी झाले आहेत. खानापूर रोड रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरु झाल्यानंतर शहराची रहदारी व्यवस्था विस्कळीत झाली आहे.कपिलेश्‍वर मंदिराजवळील नव्या उड्डाण पुलावर वारंवार वाहतुकीची कोंडी होताना दिसते.काँग्रेस रोडवरही असाच प्रकार सुरु असतो. त्यामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक दिवशी कसरत करावी लागत आहे.

टिळकवाडी परिसरातील तीन रेल्वे फाटकांवर रहदारी वाढली आहे. तीनही रेल्वे फाटकांवर रेल्वे येता-जाताना वाहनधारकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते.त्यातच पहिल्या रेल्वे फाटकादरम्यान रहदारीचा ओघ जादा आहे.दोन फाटकां दरम्यान एकेरी वाहतुक सुरु आहे. पहिल्या रेल्वे फाटकादरम्यान दोन्ही बाजूला बॅरिकेड्स टाकण्यात आले आहेत. वाहनधारकांना दुर वरुन वळसा घालून फाटक ओलांडावे लागते. त्यामुळे वाहनधारकही घाईगडबडीत फाटक ओलांडण्यासाठी कसरत करतात. याच फाटकादरम्यान रेल्वे रुळानजीक पेव्हरब्लॉकचा रस्ता बनविण्यात आला आहे. रुळाशेजारील पेव्हर ब्लॉक खचले आहेत.

खचलेल्या पेव्हर ब्लॉक रस्त्यावरुन निघालेल्या दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागत आहे. खचलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. रात्रीच्यावेळी खचलेल्या ठिकाणी पादचारी पडून जखमी झाले आहेत. याठिकाणी रहदारी पोलिसांची हजेरी असते. मात्र   खचलेल्या रस्त्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्याचे भान पोलिसांना नाही.त्यामुळे मनपानेच फाटका दरम्यानच्या खचलेल्या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.