Sat, Jul 20, 2019 10:40होमपेज › Belgaon › सम-विषम पार्किंग कायमचे हवे

सम-विषम पार्किंग कायमचे हवे

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 10:33PM

बुकमार्क करा

बेळगाव ः प्रतिनिधी

शहरात खडेबाजार व गणपत गल्लीत सम-विषम पार्किंगला सुरुवात करण्यात आली. यामुळे वाहतूक व्यवस्थित होत आहे. ही पार्किंग व्यचस्था निरंतर ठेवण्याची मागणी व्यापारी व शहरवासीयांतून होत आहे.  मुख्य बाजारपेठेत वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी वाहतूक विभागाने तेथे सम-विषम पद्धतीने दुचाकी लावण्यास प्राधान्य दिले आहे. खडेबाजारमध्ये मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या पार्किंगला दुचाकीस्वारांतूनही प्रतिसाद मिळत आहे. यामुळे आठ दिवसापासून गणपत गल्लीत सम-विषम पार्किंग केले जात आहे. यामुळे वाहतुकीला जरब बसली आहे. 

सम-विषम पार्किंगलाही शिस्त यावी यासाठी यंदेखुट सर्कलपासून शहर स्थानकापर्यंत वाहतूक पोलिस तैनात केले आहेत. विरुद्ध दिशेला दुचाकी पार्क केलेल्यांवर कारवाई केली जात आहे. यामुळे दुचाकीस्वारांत भीतीचे वातावरण आहे. गणपत गल्ली, खडेबाजार भाग मुख्य बाजारपेठेत मोडतो. यामुळे येथे सतत गर्दी राहते. यापूर्वी दुचाकी व फेरीवाल्यांच्या अडथळ्यामुळे पादचार्‍यांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत होत्या. मात्र सम-विषम पार्किंगमुळे रहदारीला शिस्त आली आहे. खडेबाजार व गणपत गल्लीप्रमाणे मारुती गल्लीसह महत्त्वाच्या भागात सम-विषम पार्किंग करण्याची मागणी केली जात आहे.