Sun, Mar 24, 2019 17:24होमपेज › Belgaon › ता. पं. सदस्य ‘नामधारी’ लोकप्रतिनिधी

ता. पं. सदस्य ‘नामधारी’ लोकप्रतिनिधी

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 8:46PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

राजकीय प्रतिष्ठेपायी लाखो रुपयांची उधळण करून निवडून आलेले तालुका पंचायत सदस्य सध्या विवंचनेत सापडले आहेत. त्यांना निधीअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे.  विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडत चालली असून सदस्य हवालदिल बनले आहेत. ता. पं. सदस्य कमी अधिकाराबरोबरच अत्यल्प निधीमुळे नामधारी लोकप्रतिनिधी बनल्याचे दिसून येत आहे.

पंचायत राज व्यवस्थेत तीन टप्प्यात ग्रामीण भागाचे राजकारण विभागले गेले आहे. स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींना अधिक अधिकार व निधी उपलब्ध व्हावा यासाठी देशस्तरावर तीन पातळीवरील पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ग्राम पंचायत, दुसर्‍या टप्प्यात तालुका पंचायत तर शेवटच्या टप्प्यात जिल्हा पंचायत यंत्रणा कार्यरत आहे.
केंद्र सरकारने ग्राम पंचायत व्यवस्था सक्षम करण्याचा निर्णय घेऊन विकासकामांना आवश्यक निधी थेट ग्रा. पंं. कडे वर्ग करण्याचा पायंडा पाडला आहे. तर जिल्हा परिषदेकडे शिक्षण, आरोग्य, वाहतूक, रस्ते, पाटबंधारे, कृषी सारख्या योजनांचा निधी उपलब्ध होत असतो. 

दुसर्‍या टप्प्यात असणार्‍या तालुका पंचायतला ग्राम पंचायत व जिल्हा पंचायतच्या तुलनेत अत्यल्प निधी उपलब्ध होतो. वर्षभरात केवळ लाखभराच्या निधीतून मतदार संघातील कोणती कामे हाती घ्यावीत, असा प्रश्‍न सदस्यांना पडत आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या तक्रारीनुसार निधी उपलब्ध करून देणे ता. पं. सदस्यांना शक्य होत नाही. यामध्ये सत्ताधारी पक्ष आणि अध्यक्ष आपल्या मतदारसंघातील कामासाठी अधिक निधी खर्च करण्यात धन्यता मानतो. यामुळे अन्य सदस्यांची गोची होत आहे. परिणामी ता. पं. सदस्य नामधारी बनले असून त्यांनी ता. पं.कडे पाठ फिरविली आहे. सदस्यांच्या हजेरीने सुरुवातीच्या काळात गजबजलेले ता. पं. कार्यालय सदस्यांनी पाठ फिरविल्यामुळे सुनसान भासत आहे.

सदस्यांना पैशाची काळजी राजकीय प्रतिष्ठेसाठी ता. पं. ची निवडणूक लढविण्यात येते. यासाठी लाखो रुपयांचा  खर्च  केला जातो. मात्र निवडून आल्यावर  विकासकामासाठी आवश्यक निधी मिळत नाही. ग्रा. पं. ना थेट निधी जातो. यामुळे ता. पं. सदस्यांच्या अडचणीत भर पडत  असून निवडणुकीसाठी खर्च केलेला पैसा कसा काढावा, याची विवंचना अनेक सदस्यांना लागून राहिली  आहे. ग्रा. पं. मध्ये हवा सन्मान ता. पं. सदस्यांच्या तुलनेत ग्रा. पं. कडे अधिक अधिकार आहेत. त्यांना लाभार्थी निवडण्याचा अधिकार आहे. यामुळे ता. पं. सदस्यांकडून स्थानिक राजकारणात जास्त रस घेण्यात येतो. मात्र त्याठिकाणी ग्रा. पं. सदस्याकडूनदेखील त्यांना योग्य सन्मान दिला जात नाही. त्याचबरोबर ग्रा. पं. ची विकासकामे ठरविताना त्यांना विचारण्यात येत नाही. परिणामी ता. पं. सदस्यांची कोंडी होत असून त्यांच्याकडून सन्मानाची मागणी केली जात आहे.