बेळगाव : प्रतिनिधी
शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात अधिकारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे येत्या मंगळवारी (दि.12)अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी विशेष बैठक घेण्याचा निर्णय आज महापालिकेत झाला. शहरात तब्बल 80 वसाहती अनधिकृत आहेत. तसेच अनेक इमारतीही अनधिकृत आहेत. मंगळवारी बांधकाम स्थायी बैठकीत उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित करताना त्या विरोधात कोणतीच कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली. जयश्री माळगी यांनी अनेकांनी नियमांचे उल्लंघन करून बांधकामे केली आहेत. अनेक इमारतींचे वरचे मजले विनापरवाना बांधण्यात आले आहेत. अनधिकृत बांधकांमाच्या ठोस माहितीसाठी विशेष पथक नेमण्याची सूचना केली.
मधुश्री पुजारी यांनी कायदेशीर मार्गाने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची सूचना केली. मात्र, अनधिकृत बांधकामांविरोधात कायदेशीर माहिती देणारे मनपा कायदे सल्लागार बैठकीला अनुपस्थित राहिल्याने विशेष बैठकीत चर्चा करण्याचे ठरले. शहरात नवे हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहेत. मात्र, सहा महिने झाले, तरी हायमास्ट दिवे प्रकाशमान झालेले नाहीत.त्यावरही बैठकीत नाराजी व्यक्त झाली. प सार्वजनिक शौचालयांची माहिती
शहरातील सार्वजनिक शौचालयांची माहिती देण्याची सुचना महापौर संज्योत बांदेकर यांनी केली. त्याचबरोबर महिलांसाठी स्वच्छतागृहांसंदर्भात अधिकार्यांना सूचना दिल्या. संबंधित विभागाचेही अधिकारी बैठकीला हजर नसल्याने पुढील बैठकीत नव्या हायमास्ट दिव्यांचा आणि काढलेल्या जुन्या दिव्यांचा तपशील मागवण्याचा निर्णय झाला. शहर-उपनगरात विविध कामांसाठी खोदाई सुरु आहे. या खोदाईला मनपाकडून परवानगी गेली आहे का, असा मुद्ा उपस्थीत करण्यात आला. त्यावर नगर विकास अधिकारी आर.एच.कुलकर्णी यांनी रस्ता खोदाईसाठी त्या त्या खात्याने परवानगी घेतल्याचे स्पष्ट केले.
बैठकीला स्थायी समितीचे सदस्य राकेश पलंगे, मिनाक्षी चिगरे,श्रेयला जनगौडा,सभागृह सचिव लक्ष्मी निपाणीकर, उपायुक्त मनमत्तयास्वामी व अन्य सदस्य उपस्थीत होते. स्थायी बैठकांमध्ये सदस्यांव्यतिरिक्त इतरांना सूचना अथवा मते मांडता येत नाहीत. मात्र आजच्या बैठकीत नगरसेवक दिनेश नाशीपुडी यांनी ऐनवेळी काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लक्ष्मी निपाणीकर यांनी त्यांना समज देताना बैठकीआधी लेखी सूचना देण्यास सांगितले.