Sun, Mar 24, 2019 23:41
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › जुने पथदीप साहित्य जाते कोठे?

जुने पथदीप साहित्य जाते कोठे?

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 13 2017 9:37PM

बुकमार्क करा


बेळगाव : प्रतिनिधी

स्मार्टसिटीतील विविध कामांची नेहमीच जोरदार चर्चा सुरु असते. मात्र दोन वर्षात स्मार्ट कामांचा पत्ताच दिसत नाही. यामध्ये शहरातील काही रस्त्यांवर दिसणारे नव्या पध्दतीचे स्मार्ट पथदीप नजरेत भरत आहेत. पुढील काही दिवसांत संपूर्ण शहर एलईडी दिव्यांनी उजळणार आहे. याचवेळी जुन्या काढलेल्या पथदीप आणि साहित्याविषयी उलट-सुलट चर्चा सुरू आहे. जुन्या साहित्याबाबत माहिती देण्यातही संबंधित खात्याकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे पथदीप व्यवस्थेच्या कारभारावर शंका उपिस्थत केल्या जात आहेत.

सध्या शहरातील अनेक भागात भूमिगत वीजवाहिनी घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर संपूर्ण शहरात नजीकच्या काळात एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत.  रस्त्यांवर 40 व्हॅटच्या 8987 ट्युबलाईट, 250 व्हॅटचे 18331 सोडियम व्हेपरलॅम्प, 5483 एमएच सेट दिवे, 70 हायमास्ट दिवे, 1112 सीएफएल दिवे तसेच 400 एलईडी असे एकूण 34,383 दिवे शहर उपनगरात बसविण्यात आले आहेत.

शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागात पथदीप व्यवस्थेचे काम योग्यरित्या करण्यासाठी अटी, नियम घालून देण्यात आले आहेत.मात्र, नियम अटी धाब्यावर बसवून पथदीप व्यवस्थेचे काम सुरू असल्याची टीका सातत्याने सुरू असते. बंद पडलेले पथदीप वेळेवर सुरू केले जात नाहीत, अशी नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत असते. मनपा सभागृहातही अनेकवेळा पथदीप व्यवस्थेवर जोरदार चर्चा झाली आहे.