होमपेज › Belgaon › बेळगावात नो हेल्मेट नो पेट्रोल

बेळगावात नो हेल्मेट नो पेट्रोल

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 1:21AMबेळगाव : प्रतिनिधी

दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्‍तीचे करूनही अनेकजण पळवाटा शोधत असल्याने आता हेल्मेट नसेल तर पेट्रोल न देण्याचा निर्णय पोलिस आणि पेट्रोल पंप मालकांच्या बैठकीत झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी बुधवार (दि.21) पासूनच होणार आहे.धारवाडमध्ये काही दिवसांपासून नो हेल्मेट, नो पेट्रोल निर्णयाचा अंमल  सुरू झाला आहे. मात्र, तेथे विरोध होतो आहे. तरीही बेळगावातही हा निर्णय लागू करण्याचे पोलिस आयुक्‍तालयाने निश्‍चित केले आहे. आज मंगळवारी पेट्रोल पंप मालक व पोलिस खात्याच्या संयुक्‍त बैठकीमध्ये उपायुक्‍त सीमा लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ अभियानाचा निर्णय घेण्यात आला. 

अनेक दुचाकीस्वार पोलिसांची नजर चुकवून विनाहेल्मेट दुचाकी चालवत आहेत. पोलिस खात्यालाही डोकेदुकी झाली आहे. शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीत हेल्मेट सक्‍तीची अंमलबजावणी करण्याचा चंग पोलिस खात्याने बांधला आहे. यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. 
पोलिस आयुक्‍तालयाच्या व्याप्तीमध्ये येणार्‍या पेट्रोल पंप मालकांची आज बैठक बोलाविण्यात आली होती. ज्या दुचाकीस्वारांकडून हेल्मेट परिधान केले जात नाही, अशा दुचाकीस्वारांना पेट्रोल न घालण्याचा आदेश बैठकीत जारी करण्यात आला. तो पंपचालकांनी मान्य केला.

हुज्जत घालणार्‍यांचे काय?

 पेट्रोल न दिल्यास पंपावर कामगारांशी हुज्जत घालणार्‍यांना कसे हाताळायचे, असा  प्रश्‍न पंपचालकांनी उपस्थित केला. त्यावर लाटकर म्हणाल्या, वाहनचालकांना समज देण्यासाठी पोलिस खाते सज्ज आहे. वाहनचालकांकडून वादावादीचे प्रसंग घडल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. संबंधितावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. 21 फेब्रुवारीपासून याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपायुक्‍त महानिंग नंदगावी, वाहतूक एसीपी महांतय्या मुप्पीनमठ, पीएसआय आर. आर. पाटील यांच्यासह शहरातील 50 पेक्षा अधिक पेट्रोल मालक उपस्थित होते. 

पंपावरही फलक, पण कन्‍नड

पंपमालकांनी पेट्रोल पंपावर ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ असे फलक लावण्यास संमती दर्शविली आहे. या बरोबरच वाहतूक नियमांचे पालन रण्यासंबंधीही फलकही लावण्यास पोलिस खात्याबरोबर सहकार्य करू, असे त्यांनी सांगितले. मात्र हे फलक केवळ कन्‍नडमध्ये आहेत. त्यामुळे बेळगावातील मराठी भाषिकांना ते कसे कळणार, हा प्रश्‍न आहे.