Sun, Mar 24, 2019 08:17होमपेज › Belgaon › विधानसभेआधी नाट्य परिषदेचा आखाडा

विधानसभेआधी नाट्य परिषदेचा आखाडा

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 20 2018 9:01PMबेळगाव : प्रतिनिधी

दोन वर्षांपूर्वी बेळगावात ताणतणावाच्या पार्श्‍वभूमीवर अ. भा. मराठी नाट्य संमेलन यशस्वीरित्या पार पडले. त्यानंतर आता पुन्हा बेळगावात अ. भा. नाट्य (साहित्य)संमेलनाची मागणी जोर धरु लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर दि. 4 मार्च रोजी अ. भा. नाट्यपरिषदेच्या कार्यकारिणीसाठी बेळगावातील तीन उमेदवारांमध्ये चुरस होणार आहे. त्याचवेळी अ. भा. नाट्य परिषदेच्या मुंबई कार्यकारिणीसाठी बेळगावातील तीन उमेदवारांमध्ये चुरस आहे. जो उमेदवार बेळगावच्या नाट्यपरंपरेला बळ देईल, त्याच उमेदवाराच्या गळ्यात यशाची माळ पडेल. दोन वर्षांपूर्वी बेळगावात अ. भा. मराठी नाट्यसंमेलन पार पडले.

बेळगावात नाट्य संमेलन होण्यापूर्वी अनेक वादही निर्माण झाले होते. मात्र, बेळगाव परिसरातील नाट्य रसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे ते संमेलन यशस्वीरित्या पार पडले होते. फैय्याज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बेळगावातील अ. भा. नाट्य संमेलनानंतर बेळगावच्या नाट्यकलेला अधिक वाव मिळेल, अशी अपेक्षा केली जात होती. बेळगावातील नाट्य संमेलनात बेळगावच्या नाट्यकलेला प्रोत्साहन व स्थानिक नाट्य कलाकारांना चांगली संधी मिळेल, अशी आश्‍वासनेही परिषदेच्यावतीने देण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांच्या काळात अपेक्षेप्रमाणे बेळगावातील नाट्य कलेला चांगला वाव मिळालेला दिसत नाही. काही निवडक उपक्रम वगळता बेळगावच्या नाट्य कलेला बळ देण्यासारखे उपक्रम किंवा कार्यक्रम झालेले नाहीत. त्यामुळे बेळगावच्या रसिकांमध्ये काहीसा हिरमोड दिसत आहे.

दरम्यान, अ. भा. नाट्य परिषदेच्या मुंबई कार्यकारिणीसाठी प्रतिनिधी स्वरुपात विविध विभागातून 60 जण निवडले जाणार आहेत. यामध्ये अ. भा. मराठी नाट्य परिषद बेळगाव शाखेच्यावतीने तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये बेळगाव शाखेच्या विद्यमान अध्यक्षा वीणा लोकूर यांच्यासह नाट्यकर्मी वृषाली मराठी व उपाध्यक्ष राजू सुतार यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
दि. 4  मार्च रोजी शहापूर येथील सरस्वती वाचनालयात निवडणूक होणार आहे. नाट्य परिषदेचे बेळगाव शाखेचे 817 मतदार आहेत. तीनही उमेदवार आपल्यापरीने प्रचार करत आहेत. तीनही उमेदवारांच्या कार्याची योग्य ती दखल घेऊन बेळगावातील नाट्यरसिक मतदार मुंबईच्या प्रतिनिधीची निवड करतील.

निवडणूक होऊ नये, ती बिनविरोध व्हावी, यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न केला आहे. मी शाखेसाठी बरेच कार्य केले आहे. बेळगावात पहिल्यांदा अ. भा. मराठी नाट्य संमेलन भरविले. नाट्य परिषदेकडून पाठपुरावा करत शासनाकडून संमेलनासाठी दहा लाख मिळवून दिले. यापुढेही मला बरंच काही करायचे आहे. या क्षेत्रातील ज्याला बरंच काही माहिती आहे, तो प्रतिनिधी म्हणून निवडून जावा, असे मला वाटते. 

- वीणा लोकूर, अध्यक्षा,  नाट्य परिषद बेळगाव

मी ज्या सदस्यांना भेटलो त्यांच्याकडून मला पाठिंबा मिळत आहे.  सभासदांकडून वर्षाला 1 हजार रुपये शुल्क घेऊनही बेळगाव शाखेने  त्यांसाठी आजपर्यंत एकही नाटक दाखविले नाही. मी त्यासाठी प्रयत्नशील राहीन. भविष्यात ग्रामीण भाग बेळगावात आणायचा आहे. प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मंच उपलब्ध करून देण्यावर भर असेल.  

-राजू सुतार, उपाध्यक्ष, नाट्य परिष बेळगाव

नाट्यक्षेत्रात अनेक पुरस्कार मिळविले आहे. माझ्या अनुभवाचा उपयोग लोकांना करायचा आहे. नाट्य परिषद काही योजना राबवित असते. त्या मला इथे राबवायच्या आहेत. बाहेर काम करण्यापेक्षा मला बेळगावात काम करायला आवडेल. बेळगाव खूप हुशार कलाकार आहेत. त्यांना म्हणावी तशी संधी व मार्गदर्शन मिळत नाही. त्यासाठी  पूर्ण वेळ  देऊन काम करण्याची माझी इच्छा आहे. नवीन लोक जेव्हा संस्थेत येतात तेव्हाच ती संस्था उत्तम प्रकारे काम करू 
शकते.

- वृषाली मराठे, ज्येष्ठ नाट्यकर्मी