बेळगाव : प्रतिनिधी
कपिलेश्वर रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ नामकरण करण्याकडे शहरातील विविध संस्था, संघटनांनी दुर्लक्ष केले आहे. उड्डाण पूल उद्घाटनाची वर्षपूर्ती होऊनही याकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे उड्डाण पूल शिवराय नामकरण विस्मृतीत गेले आहे, असे म्हणावे लागते. 25 डिसेंबर 2016 रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी उड्डाण पुलाचे उद्घाटन केले होते. यानंतर शहरातील अनेक संस्था, संघटनांनी महापालिकेला निवेदन देऊन पुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे नाव द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावेळी काही कारणास्तव हा मुद्दा रेंगाळत पडला.
काही काळानंतर आंदोलनही क्षीण झाले. उड्डाणपूल उद्घाटनानंतर शिवरायांच्या नामकरणाची चर्चा शहर परिसरात जोर धरत होती. बेळगावात झालेल्या पहिल्या उड्डाण पुलाला शिवरायांचे नाव द्यावे, अशी मागणी सातत्याने झाली. याप्रश्नी शिवप्रेमींनी महापालिकेसमोर आंदोलन करून निवेदनही दिले होते. मात्र, इतर आंदोलनाप्रमाणे हेही काही काळानंतर थंड झाले. वर्षभरापूर्वी महापालिकेला मराठी संघटनेच्या नेत्यांकडून उड्डाण पुलाला शिवरायांचे नाव देण्यासाठी निवेदन देण्यात येत होते.
तसेच इतर संघटनांकडून कपिलेश्वर पुलासाठी निवेदने देण्यात येत होती. पुलाच्या नावासाठी महापालिका सभागृहात मान्यता मिळणे गरजेचे आहे. तसेच पूल रेल्वेखात्याच्या अंतर्गत येत असल्याने त्यांचीही परवानगी गरजेची आहे. यासाठी मनपाकडून रेल्वे खात्याकडे प्रस्तावासाठी अर्ज करण्यात आला आहे. मात्र, पाठपुरावा झाला नसल्याने नामकरणाचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. लोकप्रतिनिधीही यावर शांत आहेत.
वर्षभरापूर्वी सरिता पाटील महापौर असताना पुलाला छ. शिवराय व कपिलेश्वर नाव देण्यात यावे यासंबंधी निवेदने आली. हा पूल रेल्वे खात्यांतर्गत येत असल्याने प्रस्ताव खात्याकडे पाठवला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला आहे. याची वारंवार दखल घेतली जात आहे.
- संज्योत बांदेकर, महापौर
नगरसेवक व तेथील लोकांनी नामकरणाची सूचना केली होती. जुन्या धारवाड रोडवरील पुलाला शिवरायांचे नाव द्यावे, हीदेखील चर्चा मनपा व शहरवासियांच्या बैठकीत झाली. मात्र कोणाचेही एकमत होऊ शकले नाही. मनपा सभागृहात मान्यता मिळणे गरजेचे आहे. पुलाचे काम रेल्वे खात्याने केले आहे. त्यामुळे याबाबतचा त्यांना अधिकार आहे. नामकरणाचा प्रस्ताव मनपाने रेल्वेखात्याला पाठविला आहे.
-सरिता पाटील, माजी महापौर